सर्वोच्च न्यायालयाने गुगल, फेसुबक आणि व्हॉट्सअ‍ॅपला ठोठावला १ लाखांचा दंड

सर्वोच्च न्यायालयाने गुगल, फेसुबक आणि व्हॉट्सअ‍ॅपला ठोठावला १ लाखांचा दंड

गुगल, फेसुबक आणि व्हॉट्सअ‍ॅप

सर्वोच्च न्यायालयाने याहू, फेसबुक आयर्लंड, फेसबुक इंडिया, गुगल इंडिया, गुगल खपल., मायक्रोसॉफ्ट आणि व्हाट्सअ‍ॅपला प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. लैंगिक हिंसा आणि चाइल्ड पॉर्नोग्राफी व्हिडीओसंबंधी देण्यात आलेल्या निर्देशांचं पालन न करण्यात आल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायाधीश मदन बी लोकुर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आपल्या आधीच्या आदेशात सोशल मीडिया दिग्गज आणि मायक्रोसॉफ्टला त्यांच्याकडून मान्य करण्यात आलेल्या शिफारशींसंबंधी काय प्रगती केली आहे याची माहिती मागत स्टेटस रिपोर्ट दाखल करण्यास सांगितलं होतं.

मात्र यापैकी कोणीही आपली प्रगती दाखवण्यासाठी कोणताही रिपोर्ट सादर केला नाही. तसंच कोणीही आदेशानुसार प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने १५ जून २०१८ च्या आधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला असून, यामध्ये स्टेटस रिपोर्टसंबंधी माहिती देण्यास सांगण्यास सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्रासोबत प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंडही भरण्यास सांगितलं आहे.

दरम्यान केंद्र सरकारने १५ जुलै २०१८ किंवा त्याच्या आधी ऑनलाइन सायबर क्राइम रिपोर्टिग पोर्टल लॉन्च केलं जाणार असल्याची माहिती दिली आहे. यासोबत पोर्टलला सीसीटीएनएससोबत लिंक करण्यासाठी जवळपास दोन महिन्यांचा वेळ लागू शकतो. गृह मंत्रालय यासंबंधी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत संपर्कात आहे.अनेक महत्वाची कामं अद्याप पुर्ण झाली नसल्याचं आमच्या निदर्शनात आलं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आपलं काम पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ घेतला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने गृहमंत्रालयाने आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी ३० जूनपर्यंत वेळ वाढवून दिला आहे.

एनजीओ प्रज्वलाकडून आलेल्या पत्रानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वत: दखल घेत जनहित याचिकेवर सुनावणी करत एक समिती गठीत केली होती. पत्रात इंटरनेट आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून शेअर होणाऱ्या लैंगिक अत्याचार आणि चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या व्हिडीओवर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली होती. समितीने यासंबंधी ११ शिफारशी दिल्या होत्या.
न्यायालायने यानंतर सरकारसहित इतर पक्षांना अजित कुमार समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास सांगितंल होतं. हे पक्ष व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, गुगल, याहू आणि इतरांना सामूहिक बलात्कार आणि चाइल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडीओ हटवण्यासाठी समन्वय साधत आहेत.

First Published on: May 22, 2018 8:11 AM
Exit mobile version