फेक न्यूजच्या विरोधात गुगल उतरवणार पत्रकारांची फौज

फेक न्यूजच्या विरोधात गुगल उतरवणार पत्रकारांची फौज

प्रातिनीधीक फोटो

विश्वासहर्ता, बातमीची सत्यता टिकवण्यासाठी गुगल न्युजने पुढाकार घेतला आहे. फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांना आळा घालण्यासाठी पत्रकारांनी कसे वार्तांकन करावे याचे प्रशिक्षण गुगल देणार आहे. ‘गुगल न्युज इनिशिएटिव्ह’ या उपक्रमांतर्गत ८ हजार पत्रकारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण इंग्रजी व्यतिरीक्त अन्य सहा भाषांमध्ये उपलब्ध होणार असून फेक बातमी तपासणे, प्रसारित करण्यापूर्वी बातमीची सत्यता पडताळणे आणि डिजिटल पत्रकारिता या विषयांवर भर देण्याचे लक्ष्य या उपक्रमाद्वारे आखण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी गुगलने नाव नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे.

गुगल न्यूजच्या पुढाकाराने सुरुवातीला देशातील २०० पत्रकारांना हे प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण पाच दिवसांचे असणार आहे. इंग्रजी व्यतिरीक्त हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, मराठी आणि कन्नड या सहा भाषांमध्ये प्रशिक्षण घेता येईल. पाच दिवसांच्या प्रशिक्षणानंतर पत्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर हे २०० पत्रकार प्रशिक्षक म्हणून कार्य करतील. प्रशिक्षित पत्रकार अन्य ८ हजार पत्रकारांना प्रशिक्षण देतील, असे या उपक्रमाचे स्वरुप आहे.

आशिया पॅसिफिक विभागातील गूगल न्यूजच्या आयरीन जय लिऊ यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की, “आमचे २०० प्रशिक्षित पत्रकार हे पुढच्या वर्षापर्यंत ८ हजार पत्रकारांना प्रशिक्षण देतील. गुगलला जागातील सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र बनवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.”

या कार्यक्रमासाठी गुगल न्यूजने बूम लाईव्ह, डेटा लिड्स आणि इंटरन्यूज यांच्याशी भागीदारी केली आहे. चुकीच्या बातम्या, बातमीतील सखोलता आणि बातमी मागचे सत्य शोधून काढणे यावर भर दिल्यामुळे पत्रकारितेचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. जागतिक स्तरावरील तज्ञांकडून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. न्यूज रुम, प्रेसक्लब आणि पत्रकारिता शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. पत्रकारिता शिकवणारेही यात सहभाग घेऊ शकतील.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 
– प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जदारांना तीन टप्प्यात अर्ज करावा लागणार आहे.
– इंग्रजीतून प्रशिक्षण घेणाऱ्या अर्जदारांना ५ जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे.
– हिंदी, कन्नड आणि तमिळ भाषांमधून प्रशिक्षण घेणाऱ्या अर्जदारांना १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.
– तेलगू, मराठी आणि बंगली भाषांमधून प्रशिक्षण घेणाऱ्या अर्जदारांना १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
– प्रशिक्षण कार्यक्रम ३० जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान भारतात घेतला जाणार आहे.

First Published on: June 20, 2018 3:18 PM
Exit mobile version