Gujrat Election 2022 : आज अखेरचा टप्पा; नरेंद्र मोदी, अमित शाह करणार मतदान

Gujrat Election 2022 : आज अखेरचा टप्पा; नरेंद्र मोदी, अमित शाह करणार मतदान

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 साठी आज (5 डिसेंबर) दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर हे मतदान होणार असून, 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान होणार आहे. दोन टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. (Gujarat election assembly election 2022 second phase 14 district 93 seats total 833 candidate)

बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदेपूर या जिल्ह्यातील हे 93 मतदारसंघ आहे. या 93 विधानसभा मतदारसंघांमध्ये 2.54 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. 26,409 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून सुमारे 36,000 ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात जवळपास 61 राजकीय पक्षांचे 833 उमेदवार नशीब अजमावत आहेत. यामध्ये 285 अपक्षांचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यासह दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. या टप्प्यात भाजप सर्व 93 जागांवर निवडणूक लढवत आहे.

दुसऱ्या टप्प्यात अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सर्व 93 जागांवर लढत आहेत. काँग्रेस 90 जागांवर निवडणूक लढवत असून त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भारतीय आदिवासी पक्षाने (BTP) 12 उमेदवार उभे केले आहेत आणि बहुजन समाज पक्षाने (BSP) 44 उमेदवार उभे केले आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा घाटलोडिया, भाजप नेते हार्दिक पटेल यांचा विरमगाम तसेच गांधीनगर दक्षिणचा समावेश असून जिथून भाजपचे अल्पेश ठाकोर निवडणूक लढवत आहेत. जिग्नेश मेवाणी हे बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुखराम राठवा हे छोटा उदयपूर जिल्ह्यातील जेतपूरमधून उमेदवार आहेत.

भाजपाचे बंडखोर मधु श्रीवास्तव हे वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने या 93 पैकी 51 जागा जिंकल्या होत्या. यात काँग्रेसनं 39, तर अपक्ष उमेदवारांनी तीन जागा जिंकल्या. मध्य गुजरातमध्ये भाजपने 37 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसला 22 जागा मिळाल्या.


हेही वाचा – आता भिडे गुरुजी सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर; अमृता फडणवीसांच्या मुद्द्यावरुन टीका

First Published on: December 5, 2022 7:47 AM
Exit mobile version