मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला १० वर्षांचा कारावास!

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला १० वर्षांचा कारावास!

हाफीज सईद

२६/११ च्या मुंबईवरील भीषण हल्ल्याचा मास्टरमाईंड, लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफीज सईदला पाकिस्तानी न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. हाफीज सईदसोबतच जफर इकबाल आणि याह्या मुजाहिद या हाफीजच्या दोघा साथीदारांना देखील न्यायालयाने या प्रकरणात प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. FATF च्या दबावापुढे याआधीच पाकिस्तानने हाफीज सईदच्या पाकिस्तानमधील हालचालींवर निर्बंध आणले होते. आता पाकिस्तानमधील दहशतवाद विरोधी न्यायालयाने त्याला थेट १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

२००८च्या नोव्हेंबर महिन्यात हाफीज सईदने आखलेल्या योजनेचा भाग म्हणून मुंबईवर भीषण हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये तब्बल १६६ लोकांचा जीव गेला होता. तर अनेक लोक जखमी झाले होते. १० दहशतवादी या हल्ल्यासाठी समुद्रामार्गे मुंबईत घुसले होते. यापैकी ९ दहशतवाद्यांना हल्ल्याच्याच रात्री कंठस्नान घालण्यात मुंबई पोलीस आणि कमांडोजना यश आलं होतं. तर, १०वा दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडून त्याच्यावर खटला चालवला गेला. अनेक वर्ष हा खटला चालल्यानंतर अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावली गेली.

मुंबई हल्ल्यानंतर हाफीज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याच्या डोक्यावर १० मिलियन अमेरिकी डॉलरचा इनाम देखील जाहीर करण्यात आला होता. मात्र, असं असलं, तरी हाफीज सईद पाकिस्तानमध्ये सुखेनैव संचार करताना दिसला होता. त्याचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. पाकिस्तानमधल्या निवडणुकांमध्ये हाफीज सईद प्रचार करत असल्याचं देखील दिसून आलं होतं. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने अशा प्रकार हाफीज सईदला शिक्षा सुनावणं महत्त्वाचं मानलं जात आहे.

First Published on: November 19, 2020 6:42 PM
Exit mobile version