लॉकडाऊनमध्येही झाली या प्राध्यापकाची चांदी! ७००० कोटींनी वाढली संपत्ती!

लॉकडाऊनमध्येही झाली या प्राध्यापकाची चांदी! ७००० कोटींनी वाढली संपत्ती!

खरंतर लॉकडाऊनमुळे सर्व शाळा कॉलेज बंद आहेत. पगारही वेळेवर होतील याची शाश्वती नाही. मग बातमीचं शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल की हे काय भलतंच? लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये एखाद्या प्राध्यापकाची संपत्ती ७०० कोटींनी कशी काय वाढू शकते? तर हा कुणी साधासुधा प्राध्यापक नाही. हे आहेत हार्वर्ड युनिव्हर्सिटीतले मेडिकलचे प्राध्यापक. पण तसंही कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हार्वर्ड विद्यापीठातलं कामकाज देखील थांबलेलं आहे. शिवाय, हार्वर्डमधले प्राध्यापक म्हणून जास्त पगार असणं साहजिक आहे. पण ७०० कोटी! इतकी संपत्ती नक्की वाढली कशी? आणि तीही अवघ्या दोन महिन्यांमध्ये?

‘मॉडेर्ना’ची कमाल!

तर या प्राध्यापकांचं नाव आहे टिमोथी स्प्रिंगर! प्राध्यापक स्पिंगर हार्वर्ड विद्यापीठात मेडिकल सायन्स शिकवतात. म्हणजे सध्याच्या कोरोनाच्या जागतिक साधीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट बरं का! तर स्प्रिंगर यांनी काही महिन्यांपूर्वी मॉडेर्ना इनकॉर्पोरेट या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. या कंपनीने गेल्या दोन महिन्यांत आपला वर्षभराचा नफा थेट १६२ टक्क्यांनी वाढवला आहे. कारण? ही तीच अमेरिकन बायोटेक्नोलॉजी फर्म आहे जी सध्या कोरोना विषाणूवरच्या लसीवर संशोधन करत आहे. कंपनीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात असून खुद्द अमेरिकी सरकारने देखील गेल्याच आठवड्यात कंपनीला तब्बल ४० कोटी अमेरिकी डॉलरची घसगशीत मदत दिली आहे. कोरोनाची लस शोधण्यासाठी!

१०० कोटींनी वाढली संपत्ती!

आता मॉडेर्नाचा नफा जर १६२ टक्क्यांनी वाढला असेल, तर कंपनीच्या शेअर होल्डर्सचा देखील नफा वाढणारच. पण ७२ वर्षीय स्प्रिंगर यांनी काही कोटींना खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत आता शेकडो कोटींच्या घरात गेली आहे. खरंतर आधीच प्राध्यापक टिमोथी स्प्रिंगर अमेरिकेतल्या शिक्षण क्षेत्रातले सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांची संपत्ती १० कोटी अमेरिकन डॉलरच्या घरात होती. त्यात आता कोरोना काळात मॉडेर्नाच्या वधारलेल्या शेअर्सचीही भर पडल्यामुळे ती आता थेट १०० कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास ७००० कोटींच्या घरात गेली आहे.

टिमोथी स्प्रिंगर यांच्याखालोखाल लॉकडाऊन काळात संपत्ती वाढलेल्यांमध्ये झूम व्हिडिओ कॉलिंग अॅप्लिकेशनचे संस्थापक एरिक युआन यांचा क्रमांक लागतो. त्यांची संपत्ती या वर्षात थेट दुप्पट झाली आहे. लॉकडाऊनमुळे झूम या व्हिडिओ कॉलिंग अॅप्लिकेशनचे प्रचंड संख्येने डाऊनलोड वाढल्यामुळे त्यांच्या संपत्तीत घसघशीत वाढ झाली आहे. त्यामुळे एकीकडे जगातले बहुतांश उद्योगधंदे आणि व्यक्ती कोरोनामुळे तोट्यात असताना काही उद्योगधंदे आणि व्यक्ती मात्र प्रचंड नफ्यात असल्याचं पाहायला मिळत आहे.

First Published on: April 24, 2020 12:57 PM
Exit mobile version