कर्नाटकातील जयनगरमध्ये रात्रभर हाय होल्टेज ड्रामा, ‘भाजप नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर १६ मतांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव’

कर्नाटकातील जयनगरमध्ये रात्रभर हाय होल्टेज ड्रामा, ‘भाजप नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर १६ मतांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव’

कर्नाटकातील जयनगर विधानसभा मतदारसंघात (Jayanagar assembly constituency) काँग्रेस (Congress)  आणि भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवारात जोरदार चुरस पाहायला मिळाली. भाजपचे सी. के. राममूर्ती (C K Ramamurthy) आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या सौम्या रेड्डी (Sowmya Reddy) यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत अवघ्या १६ मतांनी भाजपचे राममूर्ती विजयी झाले. त्याआधी येथे शनिवारी रात्री ते रविवारी पाहाटेपर्यंत हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. भाजप आणि काँग्रेस समर्थकांमध्ये यावेळी जोरदार चकमक देखील झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार (D K Shivakumar) यांनाही मतमोजणी केंद्रावर दाखल व्हावे लागले. सुरक्षा यंत्रणांना हस्तक्षेप करुन येथे मतमोजणीचे अनेक राऊंड घ्यावे लागेल.

ज्येष्ठ काँग्रेस नेते रामलिंग रेड्डी यांनी रविवारी आरोप केला आहे की भाजपच्या नेत्यांनी निवडणूक अधिकारी आणि आयोगावर दबाव टाकला. रामलिंग रेड्डी यांची मुलगी आणि जयनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सौम्या रेड्डी यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी शनिवारी विजयी घोषित केले होते. मात्र भाजप नेत्यांच्या दबावानंतर आयोगाने येथे निकाल बदलला असा आरोप रेड्डी यांनी केला आहे.

Karnataka Assembly Elections: जयनगरमध्ये नेमके काय झाले
सौम्या रेड्डी ५७,५९१ मते मिळाली तर राममूर्ती यांना ५७,२९७ मते मिळाली. पोस्टल बॅलेटने झालेल्या मतदानात सौम्या रेड्डी या २९४ मतांनी आघाडीवर होत्या. मात्र निवडणूक आयोगाने पोस्टल मतपत्रिकांची फेरमोजणी करण्याचे आदेश दिले. यात सकाळी अवैध ठरवण्यात आलेली मते वैध ठरवण्यात आली आणि भाजप उमेदवार राममूर्ती यांची मते वाढली.

याविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार, प्रदेश कार्याध्यक्ष आणि सौम्या रेड्डी यांचे वडील रामलिंग रेड्डी यांच्यासह कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र एस.एस.एम.आर.व्ही कॉलेज बाहेर जोरदार आंदोलन केले. सौम्या रेड्डींना न्याय देण्याची मागणी करण्यात आली.

डी.के. शिवकुमार यांनी मतदान केंद्राबाहेरील फोटो ट्विट करत म्हटले आहे की, ‘काँग्रेस उमेदवार सौम्या रेड्डी यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. मात्र फेरमतमोजणीच्या बहाण्याने निकाल बदलण्याचे काम निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत केले गेले, याचा निषेध करत आहे.’

काँग्रेसचा आरोप आहे की भाजपने शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करुन राममूर्ती यांच्या बाजूने निकाल दिला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी अवघ्या १६ मतांनी राममूर्ती हे विजयी झाल्याचे घोषित केले आहे. वास्तविक त्याआधी काँग्रेसच्या सौम्या रेड्डी यांना विजयी घोषित करण्यात आले होते.

काँग्रेस नेते रामलिंग रेड्डी यांनी भाजपने जयनगर विधानसभा मतदारसंघात केलेल्या खेळीला कोर्टात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.

First Published on: May 14, 2023 3:12 PM
Exit mobile version