‘राष्ट्रवाद’ हा शब्द नको; त्यात हिटलर, नाझीची झलक – भागवत

‘राष्ट्रवाद’ हा शब्द नको; त्यात हिटलर, नाझीची झलक – भागवत

Mohan Bhagwat

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘राष्ट्रवाद’ या शब्दाला विरोध केला आहे. ‘राष्ट्रवाद’ या शब्दाचा अर्थ नाझी किंवा हिटलरशी संबंधित असल्याचे भागवत म्हणाले. ‘राष्ट्रवाद’ या शब्दाऐवजी राष्ट्र किंवा राष्ट्रीय असे शब्द वापरा, असे देखील त्यांनी सांगितले. झारखंडच्या रांचीमधील मोहारबादी येथे आयोजित केलेल्या ‘संघ समागम’ या कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. मोरहाबादच्या रामदयाल मुंडा फुटबॉल स्टेडियममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हजारो स्वयंसेवक उपस्थित होते.

भारताच्या निर्मितीमध्ये हिंदूंची जबाबदारी अधिक असल्यामुळे हिंदूनी आपल्या राष्ट्राप्रती अधिक जबाबदार बनले पाहिजे, असे भागवत आपल्या भाषणात म्हणाले. हिंदू हा शब्द सर्वांना एकत्र आणतो. तसेच हिंदू भारतातील सर्वच धर्मांचे प्रतिनिधित्व करतो, असेही भागवत आपल्या भाषणात म्हणाले.

निवडणुकांच्या तिकिटासाठी शाखेत येऊ नका

केवळ निवडणुकीसाठी तिकीट मिळावे, या उद्देशाने जर कुणी संघाच्या शाखेत येणार असेल तर त्याने संघापासून दूरच राहावे, असा भागवतांनी दम भरला आहे. इथे कुणाचा लोभ-लालसा चालणार नसून पदाच्या लालसेपोटी संघात येणाऱ्या व्यक्तीला संघात स्थान मिळणार नाही, असेही भागवत यांनी सांगितले. संघात आल्यावर एखादे पद मिळेल या लालसेपोटी येऊ नका, ‘तर इतरांना देण्यासाठी या’ असे आवाहन भागवतांनी उपस्थितांना केले.

भागवतांचा २३ फेब्रुवारीपर्यंत रांचीतच मुक्काम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे २३ फेब्रुवारीपर्यंत रांचीमध्येच असणार आहेत. या दरम्यानच्या काळात ते गोसंवर्धन, ग्रामविकास, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता आणि सद्भाव, पर्यावरण आणि जल संरक्षण या विषयांवर स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत.

सुशिक्षित आणि सधन वर्गात जास्त घटस्फोट होतात – भागवत

नुकतेच भागवतांनी शिक्षम आणि श्रीमंतीमुळे उद्धटपणा येतो आणि त्यामुळे घटस्फोट होतात, असा अजब दावा केला होता. यावर अनेकांनी टीका केली होती. याआधी २०१३ साली इंदोरमध्ये बोलताना ते म्हणाले होते की, पुरुष घरातला कर्ता असतो, त्याने कमवावे आणि बाईने घर सांभाळावे. जर बायकोने आपल्या कर्तव्यात कसूर केली तर तिला सोडण्याचा पूर्ण अधिकार नवऱ्याला आहे.

 

First Published on: February 20, 2020 12:54 PM
Exit mobile version