देश लुटणाऱ्यांना मी घाबरवणारच – मोदी

देश लुटणाऱ्यांना मी घाबरवणारच – मोदी

गुरुवारी लोकसभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला.  राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना मोदी म्हणाले की, ‘जे देश लुटणार त्यांना मोदी घाबरवणराच.’ यावेळी ‘जनता पुन्हा आम्हालाच संधी देणार’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘२०२३ मध्ये तुम्हाला पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणण्याची संधी मिळो, असं म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचीच सत्ता असेल’, असा सुतोवाच केला. देशाची वायुसेना दुबळी व्हावी अशी काँग्रेसची इच्छा असल्याचा गंभीर आरोपही मोदी यांनी यावेळी केला. काँग्रेसने भारतीय सैनिकांना बुलेटप्रूफ जॅकेट, चांगली हेल्मेट, चांगले बूट कधच पुरवले नाहीत. काँग्रेसमुळेच जवान कमजोर झाले आहेत, असं वक्तव्य मोदी यांनी यावेळी केलं.

मी मर्यादेत राहणं तुमच्या भल्याचं…

लोकसभेदरम्यान बोलताना काँग्रेस पक्ष आणि विरोधकांना उद्देशून मोदी म्हणाले की, ‘मी माझ्या मर्यादेत राहणं हे तुमच्यासाठीच चांगलं आहे.’ यावेळी BC म्हणजे बिफोर काँग्रेस आणि AD आफ्टर डायनेस्टी असा टोलाही मोदींनी लगावला. मोदी म्हणाले की, ‘लोकसभेत १९४७ पासूनच्या गोष्टी सांगण्यात आल्या मात्र काँग्रेसला बहुधा वर्ष कळत नाही.  त्यांच्या मते BC म्हणजे बिफोर काँग्रेस आणि AD आफ्टर डायनेस्टी.’ मोदींच्या या टोल्यामुळे लोकसभेत एकच हशा पिकला. त्यापुढे जाऊन याच मुद्द्यावर मोदी म्हणाले ‘काँग्रेसला वर्ष न कळणं हे बरोबरच आहे कारण त्यांच्या आधी काहीच नव्हतं आणि जे काही देशाचं झालं आहे ते त्यांच्यामुळेच झालं आहे’.

देश कुठून कुठे पोहचला…

एकीकडे विविध मुद्द्यांवरुन विरोधक आणि काँग्रेसवर टीका करताना, दुसरीकडे मोदींनी आपल्या सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. यावेळी मोदी सरकारला सत्तेच्या काळात मिळालेल्या यशाबद्दलही ते बोलले. देश साडेचार वर्षांत कुठून कुठे पोहचला, देशात कोणते चांगले बदल झाले, कोणकोणत्या योजना यशस्वीपणे राबवल्या गेल्या… या सगळ्याचा सविस्तर अहवाल मोदींनी यावेळी सादर केला. तसंच ‘भाजपच्या काळात देशाची अर्थव्यवस्था ही ११ व्या क्रमांकावरुन सहाव्या क्रमांकावर पोहचली, याचा अभिमान का नाही?’, असा सवालही मोदींनी यावेळी उपस्थित केला.

 

 

First Published on: February 8, 2019 10:14 AM
Exit mobile version