रॅपीड टेस्ट किटमध्ये उणिवा; दोन दिवस चाचणी किट वापरू नका – ICMR

रॅपीड टेस्ट किटमध्ये उणिवा; दोन दिवस चाचणी किट वापरू नका – ICMR

देशात अनेक दिवस कोरोना विषाणूची चाचणी घेण्यासाठी रॅपीड टेस्ट किटची मागणी केली जात होती. आता केंद्र सरकारने राज्यांना किट पाठवायला सुरुवात केली आहे. दरम्यान, आता या रॅपीड टेस्ट किटवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. किट्स सदोष असल्याचं पश्चिम बंगालने म्हटलं आहे, तर आता राजस्थान सरकारने या टेस्टचे निकाल अचूक येत नाहीत, असं म्हटलं आहे. यासह राजस्थानने या चाचणीवर बंदी घातली आहे. अशा प्रकारे, रॅपीड टेस्ट किटच्या विश्वासार्हतेसंदर्भात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च, आयसीएमआर तथा भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेनेही या तक्रारींची दखल घेतली असून दोन दिवस रॅपीड टेस्ट घेण्यास बंदी घातली आहे.


हेही वाचा – Lockdown: २५ दिवस, २८०० किमीचा प्रवास; गुजरातमधून चालत गाठलं आसाम


राजस्थान सरकारचं म्हणणं आहे की सवाई मानसिंग हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या १०० कोरोना रुग्णांची या किटद्वारे चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी केवळ पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. राज्याचे आरोग्यमंत्री रघु शर्मा म्हणाले की आमच्या बाजूने कोणतीही प्रक्रियात्मक चूक झालेली नाही आणि किट्स योग्य तापमानात ठेवले गेले आहेत, तरीही चुकीचे निकाल येत आहेत. रघु शर्मा म्हणाले की आम्ही आत्ताच चाचणी थांबवली असून आयसीएमआरला याबाबत कळवलं आहे. आईसीएमआरचे डॉक्टर रमण गंगाखेडकर म्हणाले की, किट्स २० डिग्री तापमानापेक्षा कमी तापमानात ठेवणं आवश्यक आहे, अन्यथा त्याचे परिणाम देखील चुकीचे येऊ शकतात. किट्सच्या चाचणीबद्दल ही चिंतेची बाब आहे कारण राजस्थान हे पहिले राज्य आहे ज्याने रॅपीड टेस्ट सुरू केली आहे. तर पश्चिम बंगाल सरकारने आयसीएमआरने मोठ्या प्रमाणात सदोष किट पाठवल्याचा दावा केला आहे.

 

First Published on: April 21, 2020 6:13 PM
Exit mobile version