मी इंदिरा गांधींची सून, कोणालाही घाबरत नाही, ईडी चौकशीनंतर सोनिया गांधींची निडर प्रतिक्रिया

मी इंदिरा गांधींची सून, कोणालाही घाबरत नाही, ईडी चौकशीनंतर सोनिया गांधींची निडर प्रतिक्रिया

नॅशनल हेराल्डप्रकरणी गांधी कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. गेल्या महिन्यात राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली. तसेच, आता सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आजची त्यांची चौकशी संपली असून पुन्हा २५ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, ईडी चौकशी संपल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या की, मी इंदिरा गांधी यांची सून असून कोणालाही घाबरत नाही. हा व्हिडिओ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ट्विट केला आहे. (I’m Indira Gandhi’s daughter-in-law, not afraid of anyone – Sonia Gandhi)

हेही वाचा – सोनिया गांधी यांची ईडी चौकशी संपली, पुन्हा २५ जुलैला हजर राहण्याचे आदेश

सोनिया गांधी यांना २१ जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळीच त्या दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर झाल्या. त्यांची अडीच तास चौकशी करण्यात आली. आजची त्यांची चौकशी संपली असून पुन्हा २५ जुलै रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.


ईडी विरोधाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रासह देशातील काही भागांत काँग्रेसकडून आंदोलनं केली जात आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. सोनिया गांधींच्या समर्थनार्थ देशव्यापी निषेधाचा भाग म्हणून जम्मू काश्मीरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

हेही वाचा – सोनिया गांधींच्या चौकशीबाबत ईडीचा खास प्लॅन काय?

काय आहे संपूर्ण नॅशनल हेराल्ड प्रकरण

असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) या कंपनीतर्फे लखनौच्या कैसरबाग येथील हेराल्ड हाऊस नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुख्यालयातून नॅशनल हेराल्ड हे इंग्रजी, नवजीवन हे हिंदी व कौमी आवाज हे उर्दू दैनिक प्रसिद्ध होत असे. त्यांचा काँग्रेस पक्षाशी थेट संबंध असूनही संपादक एम. चलपती राव यांनी आपला स्वतंत्र बाणा जोपासला होता. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, माजी संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन अशा दिग्गजांचा तेथे कायम वावर होता. राव यांचे त्यांच्याशी चांगले वैयक्तिक संबंध असूनही त्याचा वर्तमानपत्रांच्या सडेतोड आणि नि:पक्षपाती भूमिकेवर कधी प्रभाव पडला नव्हता. त्यामुळेच स्वातंत्र्यलढ्यात आणि त्यानंतरही या वर्तमानपत्रांना जनमानसात सन्मानाचे स्थान होते. नेहरू, गोविंद वल्लभ पंत, रफी अहमद किडवाई, लालबहादूर शास्त्री यांसारख्या नेत्यांसाठीही नॅशनल हेराल्डचे महत्त्व दिल्ली किंवा चेन्नईहून प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्याही वृत्तपत्रापेक्षा कमी नव्हते. मात्र इंदिरा गांधी यांच्या हाती पंतप्रधानपद आल्यानंतर ही परिस्थिती बदलू लागली. आणीबाणीतील दडपशाहीलाही न जुमानणाऱ्या हेराल्डवर ताबा मिळवण्यासाठी इंदिरा गांधींचे प्रयत्न सुरू झाले. गांधी-नेहरू घराण्याचे विश्वासू समजले जाणारे उमाशंकर दीक्षित यांची हेराल्डच्या व्यवस्थापकीय संचालकपदी वर्णी लागली. दीक्षित पुढे केंद्रीय गृहमंत्री झाले. त्यानंतर त्यांची जागा यशपाल कपूर यांनी घेतली. कपूर यांनी एम. चलपती राव यांना पदोपदी अडचणी आणल्याने वैतागून अखेर राव यांनी संस्था सोडण्याचा निर्णय घेतला. कपूर यांना वृत्तपत्रापेक्षा त्याच्या स्थावर मालमत्तेत जास्त रस होता. दरम्यान हेराल्डची दिल्ली आवृत्तीही सुरू होऊन राजधानीतही संस्थेला मोठय़ा जागा सवलतीत मिळाल्या होत्या. एजेएलची स्थावर मालमत्ता वाढत जाऊनही कर्मचाऱ्यांची स्थिती मात्र खालावत होती. कालांतराने वेळेवर पगार होणेही दुरापास्त झाले आणि कामगार कायदे धाब्यावर बसवून अनेकांना सक्तीची निवृत्ती दिली गेली. आता काँग्रेस नेत्यांचा संस्थेच्या मोक्याच्या जागी असलेल्या आणि सोन्याचा भाव आलेल्या स्थावर मालमत्तांवर डोळा होता. त्या हडपण्यासाठी सोनिया आणि राहुल यांनी यंग इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत घोटाळा केला, असा आरोप आहे. त्यांच्यासह सुमन दुबे, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नाडिस आणि सॅम पित्रोदा यांची भूमिकाही संशयास्पद आहे.

First Published on: July 21, 2022 3:51 PM
Exit mobile version