सोनिया गांधींच्या चौकशीबाबत ईडीचा खास प्लॅन काय?

sonia gandhi

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. दिल्लीतील ईडीच्या मुख्य कार्यालयात त्यांची चौकशी होत आहे. कोरोना संसर्गामुळे ईडी चौकशीला हजर राहू न शकलेल्या सोनिया गांधींना आज पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावले आहेत. एकीकडे सोनिया गांधी यांच्या चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे ईडीने सोनिया गांधींच्या चौकशीबाबत एक खास प्लॅन तयार केला आहे. सोनिया गांधींची चौकशी तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. तसेच ८ ते १० तासांपर्यंत चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींची तीन टप्प्यांत चौकशी केली जाणार असून पहिल्या टप्प्यात त्यांना वैयक्तिक प्रश्न विचारले जातील, ज्याची संख्या १० पर्यंत असू शकते. या प्रश्नांमध्ये आयकर विभाग कर, पॅन क्रमांक, बँकेची खाती आणि देशात त्यांची मालमत्ता कुठे-कुठे आहेत, याबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात.

दुसऱ्या टप्प्यात ईडीचं पथक असोसिएट जर्नल लिमिटेड आणि यंग इंडियन संदर्भात चौकशी करणार आहे. तिसऱ्या टप्प्यात काँग्रेसबाबत प्रश्न विचारले जातील. परंतु सोनिया गांधींची चौकशी ८ ते १० तासापर्यंत होण्याची शक्यता आहे. जर त्यांची तब्येत चौकशी दरम्यान जास्त बिघडली तर त्यांना चौकशी थांबवून तात्काळ घरीही पाठवलं जाऊ शकतं, असं सांगितलं जातंय.

ईडी विरोधाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रासह देशातील काही भागांत काँग्रेसकडून आंदोलनं केली जात आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. सोनिया गांधींच्या समर्थनार्थ देशव्यापी निषेधाचा भाग म्हणून जम्मू काश्मीरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.


हेही वाचा : उठाव आणि बंड नव्हताच, ती गद्दारी अन् गद्दार म्हणूनच माथ्यावर शिक्का घेऊन फिरणार, आदित्य ठाकरेंचा घणाघात