मतदानाच्या तोंडावरच इम्रान म्हणाले, पुन्हा मोदी हवेत

मतदानाच्या तोंडावरच इम्रान म्हणाले, पुन्हा मोदी हवेत

इम्रान खान आणि नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतात पुन्हा भाजपाचे सरकार स्थापन झाले, तर आगामी काळात भारत पाकिस्तानदरम्यान कश्मीरच्या मुद्यावरून शांतता आणि सामंजस्याच्या वाटाघाटी करण्यासाठी चांगले वातावरण तयार होऊ शकते, असा आशावाद पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केला आहे. आज परदेशी पत्रकारांशी केेलेल्या वार्तालापादरम्यान त्यांनी भारतातील निवडणुका दोन देशांमधील संबंधावर आपली मते व्यक्त केली आहेत. भारतात लोकसभेच्या निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान उद्या होत आहे. त्याच्या आदल्या दिवशीच आज पाकिस्तानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

मात्र भारतातील पुढील सरकार जर कॉँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांचे बनले, तर भाजपाच्या दबावाखाली येऊन ते कदाचित दोन देशांतील शांततेची चर्चा थांबवू शकतील, अशी भीतीही इम्रान खान यांनी व्यक्त केली. इम्रान खान म्हणाले की मोदींच्या शासनकाळात कश्मीरच नाही, तर संपूर्ण भारतातील मुसलमानांमध्ये एकाकीपणाची भावना निर्माण झाली आहे. भारतात मुस्लीमांवर हल्ले होत आहेत. काही वर्षांपूवी भारतातील मुस्लीम आनंदी आणि शांततेत जगत होतेे, पण अलिकडच्या काळात निर्माण झालेल्या टोकाच्या हिंदूत्वामुळे सर्व मुसलमान काळजीत जीवन जगत आहेत.

माजी क्रिकेटपटू असलेले पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी हे निवडणुक आधारित भीती आणि राष्ट्रवादाचे राजकारण करत आहेत. भाजपाच्या जाहीरनाम्याचा समाचार घेत इम्रान खान म्हणाले की जम्मू आणि कश्मीरच्या जनतेले असलेले विशेषाधिकार काढून टाकण्याचा मुदद्दा भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात घेतला आहे, हा प्रकार केवळ निवडणुकीचे राजकारण करणारा आहे.

पाकिस्तानातील सर्व अतिरेकी संघटनांना नष्ट करण्यास आम्ही बांधिल असून यासाठी पाकिस्तानी सैन्याला सरकार संपूर्ण सहकार्य करत असल्याचेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.

First Published on: April 10, 2019 10:41 AM
Exit mobile version