पाकिस्तानात नमाज पठण सुरू असतानाच मशिदीत स्फोट, १७ जणांचा मृत्यू

पाकिस्तानात नमाज पठण सुरू असतानाच मशिदीत स्फोट, १७ जणांचा मृत्यू

पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत नमाज पठण सुरू असतानाच बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी झाले आहेत. ही घटना पेशावर पोलीस लाईन जवळ घडली आहे. तसेच या बॉम्बस्फोटात मशिदीची भींत पडली आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

बॉम्बस्फोटानंतर मशिदीबाहेर अनेकजण मदतीसाठी याचना करत आहेत. स्थानिकांनी या घटनेनंतर तात्काळ त्यांना मदत करण्यास सुरूवात केली. लेडी रीडिंग रुग्णालयाचे (एलआरसी) प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. असीमने पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनला सांगितले की, हा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे आणि केवळ रुग्णवाहिकांनाच परिसरात प्रवेश दिला जात आहे.

या घटनेत मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) पाकिस्तानचा या भागात बराच प्रभाव असून यापूर्वी या संघटनेने येथे हल्ल्याची धमकीही दिली होती. यापूर्वीही मार्च २०२२ मध्ये शिया मशिदीत मोठा स्फोट झाला होता. ज्यामध्ये ५७ जणांचा मृत्यू झाला होता.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि पीडितांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूतीही व्यक्त केली. पेशावरच्या पोलीस लाईन मशिदीत जुहरच्या नमाजदरम्यान झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो, असे इम्रान खान म्हणाले. माझी प्रार्थना आणि संवेदना पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहेत.


हेही वाचा : बँकेच्या मॅनेजरनेच लावला ग्राहकांना चुना, आयडीबीआय बँकेतून पैसे गायब


 

First Published on: January 30, 2023 3:46 PM
Exit mobile version