चीनने पुन्हा कुरापत काढली तर सडेतोड उत्तर मिळेल; संरक्षण मंत्र्यांची संसदेत ग्वाही

चीनने पुन्हा कुरापत काढली तर सडेतोड उत्तर मिळेल; संरक्षण मंत्र्यांची संसदेत ग्वाही

अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे. दरम्यान, या मुद्द्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन दिले. “भारतीय लष्कराने चीनला धाडसाने उत्तर दिले. भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना परत पाठवले. तसेच, यादरम्यान भारतीय लष्कराचा एकही जवान शहीद झाला नाही किंवा कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही”, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. त्याशिवाय, चीनने पुन्हा कुरापत काढली तर भारतीय सैन्य सडेतोड उत्तर देईल, अशी ग्वाहीही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली. (india china clash in arunachal pradesh rajnath singh statement in lok sabha and rajya sabha)

अरुणाचलमधील तवांग येथील घटनेबाबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन दिले. यावेळी ते म्हणाले की, “9 डिसेंबर 2022 रोजी, पीएलए जवानांनी स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने त्याचा खंबीरपणे सामना केला. यादरम्यान हाणामारीही झाली. भारतीय लष्कराने चिनी सैनिकांना अतिक्रमण करण्यापासून रोखले आणि त्यांना त्यांना परत पाठवले. यादरम्यान भारतीय सैन्याचा एकही जवान शहीद झाला नाही किंवा कोणीही जखमी झाला नाही. या घटनेनंतर, तेथील स्थानिक कमांडरने 11 डिसेंबर 2022 रोजी प्रस्थापित व्यवस्थेअंतर्गत आपल्या चिनी समकक्षासोबत ध्वज बैठक घेतली आणि घटनेवर चर्चा केली. चीनच्या बाजूने सीमेवर शांतता राखण्यास सांगितले होते. हा मुद्दा चीनच्या बाजूने राजनैतिक पातळीवरही मांडण्यात आला आहे.

पुढे राजनाथ सिंह म्हणाले, “मी या सभागृहाला खात्री देऊ इच्छितो की, भारतीय सैन्य आपल्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहेत. तसेच, त्याविरुद्ध कोणतेही प्रयत्न रोखण्यासाठी सदैव तयार आहेत. मला खात्री आहे की, या संसदेत भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि धैर्याला एकमताने पाठिंबा देईल.

वास्तविक, 9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. भारताच्या 6 जखमी जवानांना गुवाहाटी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याआधी काँग्रेस, आरजेडी, तृणमूल काँग्रेस, आपसह सर्व विरोधी पक्षांनी राज्यसभा आणि लोकसभेत या विषयावर तातडीने चर्चा करण्याची मागणी करणारी नोटीस दिली आहे. दुसरीकडे, पीएम मोदींनी मंत्रिमंडळाची बैठकही बोलावली आहे.


हेही वाचा – शरद पवारांना जीवे मारण्याच्या धमकीचा निनावी फोन; वर्षभरातील दुसरी घटना

First Published on: December 13, 2022 12:41 PM
Exit mobile version