लडाख सीमाप्रकरणी लष्कर प्रमुखांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा

लडाख सीमाप्रकरणी लष्कर प्रमुखांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा

भारत – चीन सीमेवर दोन्ही देशाच्या सैन्यांमध्ये चमकम होण्याच्या घटना वाढत असतानाच याचे गांभिर्य लक्षात घेऊन लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी या संबंधी सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली असून लष्कर प्रमुख यांनी संरक्षण मंत्र्यांना पूर्व लडाखच्या लाईन ऑफ अॅक्युअर कंट्रोल (एलएसी) वरील सद्यपरिस्थितीची माहिती दिली. या भेटीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यापैकी जनरल नरवणे यांनी राजनाथ सिंह यांना लोकल आर्मी कमांडर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर एलएसीवर भारताची संरक्षण तयारी किती भक्कम आहे याची माहिती दिली. तसेच या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, हेदेखील त्यांना सांगितले. चीन कोणत्या परिसरात आपले सैन्य पुढे पुढे सरकवत आहेत, याचीही माहिती संरक्षण मंत्र्यांना देण्यात आली. अशा परिस्थितीत भारतीय लष्कराची काय भूमिका आहे, हेही त्यांना सांगितले.

हेही वाचा – …तोपर्यंत पोलिसांच्या कुटुंबास पोलीस क्वार्टर्समध्ये राहता येणार

यापूर्वी भारत आणि चिनी सैन्याच्या दरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर सैन्य प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी २३ जून रोजी लेहचा दौरा केला होता. यावेळी, सैन्य प्रमुख १४ व्या लष्कराच्या लष्करी अधिकाऱ्यांसमवेत परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. पूर्व लडाखमधील सीमाप्रश्न सोडवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी भारतीय आणि चीनी या दोन्ही सैन्यांच्या कमांडर्सची मोल्दो येथे बैठक पार पडली. तणाव दूर करण्यासाठी ६ जून रोजी झालेल्या पहिल्या बैठकीनंतरची ही दुसरी बैठक होती. तत्पूर्वी, भारताच्या वतीने १४ कोर कमांडर लेफ्टिनेंट जनरल हरिंदर सिंग आणि दक्षिण झिनजियांग मिलिटरी डिस्ट्रिक्ट चीफ मेजर जनरल लियू लिन यांच्यात बैठक पार पडली.

First Published on: June 26, 2020 11:56 PM
Exit mobile version