जगाच्या अडचणी दूर करण्याचे सामर्थ्य भारतामध्ये; ब्रिटिश राजदूत

जगाच्या अडचणी दूर करण्याचे सामर्थ्य भारतामध्ये; ब्रिटिश राजदूत

नवी दिल्लीः जगासमोर असलेल्या कठीण समस्या दूर करण्याचे सामर्थ्य भारतात आहे, असा विश्वास ब्रिटीश राजदूत अलेक्झेंडर एलिस यांनी व्यक्त केला आहे.

ब्रिटीश राजदूत अलेक्झेंडर म्हणाले, जी-२० चे अध्यक्षपद असल्याने भारतीची नवीन व अत्याधुनिक ओळख जगाला करून देण्याची संधी भारताकडे आहे. भारत बलशाली आहे. कोणत्याही देशासोबत चर्चा करण्याची ताकद भारतामध्ये आहे. पर्यावरण, आरोग्य व अन्य जागतिक समस्येवर तोडगा काढण्याचे सामर्थ्य भारताकडे आहे.

भौगोलिक व राजकीय द्वंदात जगाचे तुकडे झाले आहेत. देशादेशांमध्ये स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा मोडीत काढून भारत सर्व देशांना एकत्र घेऊन पुढे जाऊ शकतो. डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत जी-२० चे अध्यक्षपद भारताकडे आहे. सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी व तत्काळ अमंलबजावणी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे. जी-२० परिषदेच्या माध्यमातून भारताचे धोरण अन्य देशांसमोर ठेवले जाऊ शकते. विकसित देशांसमोर हे धोरण ठेवले जाऊ शकते, असेही ब्रिटीश राजदूत अलेक्झेंडर यांनी सांगितले.

भारताच्या अध्यक्षतेतखालील जी-२० परिषद ही एक जमीन, एक कुटुंब व एक भविष्य यावर आधारीत आहे. हे तत्त्व प्राचिन वेदातून घेण्यात आले आहे. जी-२० परिषद केवळ दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये आयोजित केली जाणार नाही तर ५० शहरांमध्ये याचे आयोजन केले जाणार आहे. या परिषदेतून समृद्ध भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे.

ब्रिटीश उच्चायुक्त यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थान द्यावे असे ब्रिटनचेही म्हणणे आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बदल अशक्य आहे. पण त्यासाठी काम करायला हवे. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरक्षा परिषदेत बदल करण्यात आले. वर्ल्ड ट्रेड संस्थेच्या स्थापनेनंतर यात बदल करण्यात आले. ९० च्या दशकात काही बदल झाले होते. आता भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बदल करायला हवेत, असे मत ब्रिटीश उच्चायुक्त यांनी व्यक्त केले.

First Published on: January 23, 2023 6:54 PM
Exit mobile version