Corona Update: देशात गेल्या २४ तासांत कोरोनावर मात करणाऱ्या रूग्णांची संख्या बाधितांपेक्षा अधिक; ३,८९० जणांचा बळी

Corona Update: देशात गेल्या २४ तासांत कोरोनावर मात करणाऱ्या रूग्णांची संख्या बाधितांपेक्षा अधिक; ३,८९० जणांचा बळी

देशात कोरोनाचं थैमान सुरू असताना अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच असताना दिलासादायक बाब म्हणजे देशात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची अधिक नोंद करण्यात आली आहे. तर शुक्रवारी करण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या तुलनेत गेल्या २४ तास घट झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आजच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ३ लाख २६ हजार ०९८ नवे कोरोनाबाधित आढळले असून ३ हजार ८९० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ लाख ५३ हजार २९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ४३ लाख ७२ हजार ९०७ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ६२ हजार ३१७ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ४ लाख ३२ हजार ८९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात सध्या ३६ लाख ७३ हजार ८०२ इतके सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात कोरोना लसीकरण देखील सुरू आहे. आतापर्यंत देशात १८ कोटी ४ लाख ५७ हजार ५७९ जणांचे लसीकरण पार पडले आहे. दरम्यान, १४ मेपर्यंत ३१ कोटी ३० लाख १७ हजार १९३ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी शुक्रवारी दिवसभरात १६ लाख ९३ हजार ०९३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असल्याची माहिती आयसीएमआरने दिली.

राज्यात रुग्णांच्या संख्येत चढ-उतार

महाराष्ट्रात मागील काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. गुरुवारी राज्यात ४२ हजार ५८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. शुक्रवारी हा आकडा कमी झालेला दिसला. शुक्रवारी ३९ हजार ९२३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाख ९ हजार २१५ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख १९ हजार २५४ वर पोहोचली आहे. तसेच आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे शुक्रवारी मृतांच्या आकड्यातही घट झालेली दिसली. गुरुवारी ७९३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता, तर शुक्रवारी ६९५ मृतांची नोंद झाली.

First Published on: May 15, 2021 2:14 PM
Exit mobile version