राफेल फायटर विमानांचं २९ जुलैला भारतात लँडिंग

राफेल फायटर विमानांचं २९ जुलैला भारतात लँडिंग

भारतीय वायूसेनेसाठी २९ जुलै हा दिवस विशेष असणार आहे. कारण बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘राफेल’ फायटर विमानांची पहिली तुकडी येत्या २९ जुलै रोजी भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. हरयाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर ही राफेल फायटर विमाने तैनात करण्यात येणार आहेत. युद्धात गेम चेंजर ठरु शकणाऱ्या या विमानांचा अंबाला एअर बेसवर मुख्य तळ असणार आहे. सर्व काही नियोजनानुसार झाले, तर २० ऑगस्टला पारंपारिक पद्धतीने सोहळा आयोजित करुन या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येणार आहे.

राफेल विमान कसं हाताळायचं, त्याबद्दल व्यापक असं प्रशिक्षण IAF च्या एअर क्रू आणि ग्राऊंड क्रू टीमला देण्यात आलं आहे. भारताने फ्रान्सबरोबर अशी ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला असून पूर्णपणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशी ५ विमाने २९ जुलैला मिळणार आहेत. राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला एअर बेसवर तर दुसरं स्क्वाड्रन पश्चिम बंगाल हाशिमारा येथे असेल. भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. यामुळे शत्रुच्या प्रदेशात खोलवर अचूक हल्ला करण्याची भारतीय हवाई दलाची क्षमता वाढणार आहे.

येत्या २ वर्षात भारताला ३६ राफेल मिळणार

पुढील दोन वर्षांत भारताला दोन स्क्वॉड्रनमध्ये फ्रान्सहून राफेल विमान मिळणार आहेत. वायुसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला पथक अंबाला बेस येथून वेस्टर्न कमांडसाठी काम करणार आहे, तर दुसरा स्क्वाड्रन पश्चिम बंगालमधील हाशिमारा एअरफोर्स स्टेशनवर तैनात केला जाणार आहे. याबाबतची माहिती ‘आजतक’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.


हेही वाचा – रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करणे दुर्भाग्यपूर्ण – दुग्धविकास मंत्री सुनिल केदार


 

First Published on: July 21, 2020 1:28 PM
Exit mobile version