भारतात पहिली मानवी अंतरिक्ष मोहिम राबवण्यात येणार – बिपिन पुरी

भारतात पहिली मानवी अंतरिक्ष मोहिम राबवण्यात येणार – बिपिन पुरी

लष्करी वैद्यकीय सेवा विभागाचे महासंचालक लेफ्टिनेंट जनरल बिपिन पूरी

भारताच्या पहिल्या मानवी अंतरिक्ष अभियानासाठी बंगलोरची इंडियन एरोस्पेस मेडिसिन ही संस्था सहकार्य करणार असून, भारतीय वायुदल, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहिम राबवण्यात येणार आहे. लष्करी वैद्यकीय सेवा विभागाचे महासंचालक लेफ्टिनेंट जनरल बिपिन पूरी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, या संदर्भात इस्त्रोने संपर्क साधला असून यावर सध्या चर्चा सुरु आहे.

“भारतीय नौसेनेची व्याप्ती वाढत आहे, यामुळे नौदलासमोरची आव्हाने पण वाढत आहेत. या आव्हानासमोर जाण्यासाठी सागरी वैद्यकीय शास्त्र अर्थात मरीन मेडिसिन या विषयात एम डी अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. याआधी या क्षेत्रातील पदविका अभ्यासक्रम होता, पण तो अपुरा असल्याने पद्वयुत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यात येत असून जगातील हा पहिला अभ्यासक्रम आहे. मुंबईतील आय. एन. एस अश्विनी या नौदलाच्या रुग्णालयात हा अभ्यासक्रम सुरु होणार आहे.” –  लेफ्टिनेंट जनरल बिपिन पूरी

१८ देश होणार सहभागी

मार्च महिन्यात लष्करी वैद्यक शास्त्र या विषयावर आशियान या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून १८ देश यामध्ये सहभागी होणार आहेत. नैसर्गिक आपत्ती, रासायनिक, आण्विक आणि जैविक युद्ध यावर चर्चा होणार असल्याचे पूरी यांनी सांगितले. लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा पण प्रस्ताव असल्याचे पूरी म्हणाले. Afmc तर्फे लष्करी वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक उपकरण सादर करण्यात आली.

First Published on: February 7, 2019 3:52 PM
Exit mobile version