अरुणाचलच्या तवांगजवळ भारत आणि चीनचे सैनिक पुन्हा भिडले

अरुणाचलच्या तवांगजवळ भारत आणि चीनचे सैनिक पुन्हा भिडले

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 9 डिसेंबरला घडली. ही चकमक झाल्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांनी या परिसरातून माघार घेतली.

अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमधील एलएसीनजीक यांगत्से येथे 9 डिसेंबर 2022 रोजी भारतीय जवान आणि चीनच्या पीएलएच्या (पीपल्स लिबरेशन आर्मी) सैनिकांमध्ये हाणामारी झाली. या चकमकीत चीनचे सैनिक जखमी झाले. मात्र एकही भारतीय जवान गंभीर जखमी झालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शुक्रवारी, 9 डिसेंबर रोजी चिनी सैन्य यांगत्से भागात आल्यानंतर त्यांनी आधी झटापटीला सुरुवात केली. भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर देत त्यांना पळवून लावले. या घटनेनंतर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये फ्लॅग मीटिंग झाली आणि हे प्रकरण मिटवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि, भारतीय लष्कराकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील एलएसीजवळील काही भागांवर भारत आणि चीन दोन्ही देशांकडून दावा केला जातो. त्याचाच परिणाम म्हणून 2006पासून अनेकदा अशी प्रकरणे समोर येत आहेत.

दोन वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यात धुमश्चक्री
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात पॅंगॉन्ग त्सो तलावाच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर 1 मे 2020 रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन्ही बाजूचे अनेक सैनिक जखमी झाले. येथून उभय देशातील तणाव वाढला आणि पुढील गोष्टी घडत गेल्या. 15 जून आणि 16 जून 2020च्या मध्यरात्री उभय देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या मारामारीत जीवितहानी झाली होती. गलवान खोऱ्यातील संघर्ष हा भारत आणि चीन यांच्यातील चार दशकांतील सर्वात प्राणघातक संघर्ष होता.

चिनी सैनिक घुसखोरीचा प्रयत्न करत होते. भारतीय जवानांनी त्यांना रोखल्यावर ते आक्रमक झाले. यानंतर वाद अधिकच वाढला आणि हाणामारी झाली. त्यात उभय देशांच्या सैनिकांनी मोठ्या प्रमाणात दगड आणि रॉडचा वापर केला. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले, तर 38हून अधिक चिनी सैनिक मारले गेले. चीनने केवळ चार सैनिक मारले गेल्याचे सांगितले तर, अमेरिकेच्या एका रिपोर्टनुसार 45हून अधिक चिनी सैनिक मारले गेले.

 

First Published on: December 12, 2022 7:53 PM
Exit mobile version