लॉकडाऊन काळात रद्द रेल्वे तिकिटाचा परतावा हवाय ? रेल्वे मंत्रालयाने दिली मुदतवाढ

लॉकडाऊन काळात रद्द रेल्वे तिकिटाचा परतावा हवाय ? रेल्वे मंत्रालयाने दिली मुदतवाढ

कोरोना काळात रद्द झालेल्या मेल एक्सप्रेसच्या तिकिटा रिफंड मिळवण्यासाठीची मुदत भारतीय रेल्वेने वाढवली आहे. तिकिटाचा रिफंड मिळवण्याची आधीची सहा महिन्यांची मुदत आता नऊ महिने करण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने जाहीर केली आहे. त्यामुळे कोरोना काळात प्रवास न करू शकलेल्या प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा भारतीय रेल्वेमार्फत देण्यात आला आहे. कोरोना काळातील २१ मार्च ते ३० जून दरम्यान ज्या प्रवाशांनी तिकिटे काढली आहेत, अशा प्रवाशांना हा रिफंड मिळणार आहे. रेल्वेने वाढवलेल्या मुदतीमुळे हा रिफंड मिळवण्यासाठी प्रवाशांना अतिरिक्त असा वेळ मिळणार आहे.

तिकिट रद्द करण्यासाठी काऊंटरवर गर्दी

अनेक प्रवाशांनी उन्हाळी सुट्ट्यांचे नियोजन करून मार्च ते जून या महिन्यात तिकिटे काढली होती. पण कोरोनाच्या संकटामुळे अचानक लॉकडाऊनची घोषणा झाल्यानेच अनेक ठिकाणी प्रवाशांनी प्रवासाचे बेतच रद्द केले. मार्चअखेरीस ते जूनपर्यंत संपुर्ण रेल्वेचे जाळेच ठप्प झाल्याने हजारो प्रवाशांची प्रवासाची अडचण झाली. त्यामुळे आपण बुक केलेल्या तिकिटाचा परतावा मिळवण्यासाठीची अनेकांनी रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केली होती. त्यानुसारच सुरूवातीच्या टप्प्यात सहा महिन्यांचा कालावधी हा रेल्वे प्रवाशांना देण्यात आला. पण मोठ्या प्रमाणात रेल्वे काऊंटरवरील गर्दी पाहता ही मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता सहा महिन्यांएवजी नऊ महिन्यांपर्यंत रेल्वेच्या तिकिटाचा परतावा घेता येणार आहे.

 

First Published on: January 8, 2021 12:01 PM
Exit mobile version