Statue of Unity: पंतप्रधान मोदी आज ८ रेल्वेंना दाखवणार हिरवा झेंडा

Statue of Unity: पंतप्रधान मोदी आज ८ रेल्वेंना दाखवणार हिरवा झेंडा

गुजरातमध्ये असणारा जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देणे आता अधिक सोपे होणार आहे. भारतीय रेल्वेने रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून देशातील विविध शहारांमधून गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’ला भेट देण्यासाठी पर्यटकांना योग्य पर्याय दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार) गुजरातमधील केवडिया येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी जोडल्या जाणाऱ्या आठ रेल्वेंना सकाळी ११ वाजता हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या सर्व रेल्वे केवडियाला (स्टॅच्यू ऑफ यूनिटी) वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगर या शहरांना जोडणार असल्याचे सांगितले जात आहे.

केवडिया रेल्वेस्थानक अद्यावत सुविधांनी परिपूर्ण असून, हे देशातील पहिले ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकीट प्राप्त रेल्वेस्थानक आहे. रेल्वे योजनेच्या या उद्घाटनाप्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे. या योजनेमुळे भारतीय रेल्वेच्या नकाशावर जगातील सर्वात भव्य अशा स्टॅच्यू ऑफ यूनिटीला देखील स्थान मिळणार आहे. तसेच, यामुळे गुजरातमधील पर्यटनास देखील मोठी चालना मिळणार आहे. या अगोदर स्टॅच्यू ऑफ यूनिटी पाहण्यास जाण्यासाठी पर्यटकांना वडोदरा, भरूच आणि अंकलेश्वर रेल्वेस्थानकावर पोहचावे लागत होते.

असं आहे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ 

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. यापूर्वी अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ हा ९३ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा होता. अवघ्या पाच वर्षात या स्मारकाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. ३१ ऑक्टोंबर २०१३ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनीच या स्मारकाचे भूमिपूजन केले होते. नर्मदा नदीतील सरदार सरोवर धरणात हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.

First Published on: January 17, 2021 9:52 AM
Exit mobile version