INX Media Case : या व्यवहारात चिदम्बरम दोषी कसे? – मनमोहन सिंग

INX Media Case : या व्यवहारात चिदम्बरम दोषी कसे? – मनमोहन सिंग

मनमोहन सिंग यांची टीकस्र

आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी तिहार जेलमध्ये कोठडीत असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्यावर सध्या सत्ताधारी भाजपच्या नेतेमंडळींनी जोरदार टीका सुरू केली आहे. मात्र, देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी चिदम्बरम यांची पाठराखण केली आहे. ‘या सगळ्या प्रकरणात चिदम्बरम कसे काय दोषी ठरू शकता?’ असा प्रश्नच मनमोहन सिंग यांनी केला आहे. चिदम्बरम केंद्रीय अर्थमंत्री असताना मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेली भूमिका या प्रकरणात महत्वाची ठरते.

‘मंत्र्यांनी फक्त शिफारशीला मंजुरी दिली’

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत चिदम्बरम यांची सोमवारी तिहार जेलमध्ये भेट घेतली. या भेटीनंतर सिंग यांनी चिदम्बरम यांच्या अटकेवर चिंता व्यक्त केली आहे. ‘चिदम्बरम यांना इतक्या दिवसांपासून कोठडीत ठेवल्यामुळे आम्हाला चिंता वाटत आहे. न्यायालय या प्रकरणी न्याय करेल अशी आम्हाला आशा आहे. भारतीय व्यवस्थेमध्ये एक व्यक्ती कोणताही निर्णय घेत नाही. सर्व निर्णय हे सर्व मिळून घेत असतात. आयएनएक्स मीडियाला निधी पुरवण्याच्या प्रस्तावाची शिफारस किमान डझनभर सरकारी अधिकाऱ्यांनी, ज्यातले ६ सरकारचे सचिव होते, सरकारकडे केली होती. चिदम्बरम यांनी या सगळ्यांनी शिफारस केलेला प्रस्ताव मान्य केला आहे’, असं मनमोहन सिंग म्हणाले.


हेही वाचा – ‘मोदीजी, मनमोहन सिंगांचं ऐका’; सामनातून शिवसेनेनं सरकारला सुनावलं!

‘..तर आख्खी यंत्रणा कोलमडून पडेल’

दरम्यान, ‘जर अधिकारी दोषी नसतील, तर मंत्री कसे दोषी ठरतील?’ असा सवाल देखील सिंग यांनी उपस्थित केला आहे. ‘चिदम्बरम यांनी फक्त अधिकाऱ्यांनी शिफारस केलेला प्रस्ताव मान्य केला होता. मग जर अधिकारी दोषी ठरत नसतील, तर चिदम्बरम कसे दोषी ठरतील? हे आमच्या समजण्याच्या पलीकडचं आहे. जर कुणा मंत्र्याला अशा शिफारशी मंजूर केल्यामुळे जबाबदार धरलं, तर आख्खी यंत्रणाच कोलमडून पडेल’, असं देखील मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.

First Published on: September 24, 2019 2:34 PM
Exit mobile version