Coronavirus: इराणच्या सभापतींना कोरोनाची लागण

Coronavirus: इराणच्या सभापतींना कोरोनाची लागण

इराणचे सभापती अली लारीजानी यांना कोरोनाची लागण

इराणमध्ये कोरोना कहर करत आहे. इराणमध्ये कोरोनाचे ५० हजाराहून अधिक रुग्ण आहेत दरम्यान, इराणमधऊन एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणच्या संसदेचे सभापती अली लारीजानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. इराणच्या संसदेच्या सभापतींची कोरोनाची चाचणी केली असता पॉझिटीव्ह आली आहे. सरकारी टेलिव्हिजनने गुरुवारी हे वृत्त दिले आहे. अली लारीजानी यांच्यामध्ये कोरोनाची काही लक्षणे दिसून आल्यानंतर कोरोना विषाणूची चाचणी करण्यात आली होती. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत, असं अहवालात म्हटलं आहे.


हेही वाचा – Coronavirus: जागतिक बँक भारताला कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देणार १ अब्ज डॉलर्स


६२ वर्षीय लारीजानी इराणच्या राष्ट्रपतींचे निकटवर्तीय आहेत. २०१६ मध्ये संसद अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा या पदासाठी निवडून आले. आतापर्यंत संसर्ग झालेल्या सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी ते एक आहेत. आतापर्यंत विधिमंडळातील २९० सदस्यांपैकी किमान २३ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती राज्य वृत्तसंस्था आयआरएनएने मंगळवारी दिली.

दरम्यान, गुरुवारी इराणमध्ये कोरोना विषाणूमुळे १२४ जणांचा मृत्यू झाला. तर २ हजार ८७५ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ५० हजार ४६८ वर पोहोचला आहे. राष्ट्रपती हसन रूहानी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा इशारा दिला होता की, देशाला अजून एक वर्ष महामारीच्या विरोधात लढा द्यावा लागेल. कोरोना विषाणूचा कहर कधी संपेल हे आपण सांगू शकत नाही. मार्च २०२१ मध्ये चालू इराणी वर्षाच्या आगामी महिन्यांत किंवा शेवटपर्यंत हा विषाणू असू शकतो, असे रूहानी म्हणाले.

 

First Published on: April 3, 2020 8:04 AM
Exit mobile version