तुझ्याकडून मोठी चूक झाली आहे – इस्रायलच्या महावाणिज्य दूतांनी लॅपिडला झापले

तुझ्याकडून मोठी चूक झाली आहे – इस्रायलच्या महावाणिज्य दूतांनी लॅपिडला झापले

गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या ५३व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये इस्रायली दिग्दर्शक आणि ‘इफ्फी’चे ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सर्वच स्तरावरून संताप व्यक्त होत आहे. द काश्मीर फाईल्स हा चित्रपट अश्लील आणि प्रचारकी असल्याचे विधान त्यांनी केले. त्यावर इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांनी लॅपिड यांना सुनावल्यानंतर इस्रायलचे (consul general ) महावाणिज्यदूत कोबी शोषणी यांनीही लॅपिड यांचे विधान अस्वीकाहार्य असून ते त्यांचे खासगी मत असून इस्रायलशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करत त्यांना झापले.

याप्रकरणावर एका वृत्तसंस्थेशी बोलताना शोषणी यांनी सांगितले की, लॅपिड यांच्या वादग्रस्त विधानानंतर माझे त्यांच्याशी बोलणे झाले. तुमच्याकडून मोठी चूक झाल्याची समज मी त्यांना दिली. तसेच या वादानंतर राजदूत गिलॉन आणि मी देखील ट्वीट केले. त्यात लॅपिड यांनी वापरलेला प्रचारकी शब्द हा अस्वीकाहार्य असल्याचे म्हटले आहे. तसेच लॅपिड हे देशाचे प्रतिनिधीत्व करत नाहीयेत हे देखील आम्ही स्पष्ट केल्याचे शोषणी म्हणाले.

यावेळी शोषणी यांनी, द काश्मीर फाईल्स चित्रपटावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केली. हा चित्रपट बघून आपल्याला खूप वेदना झाल्या. चित्रपटातील भयानक वास्तव बघून डोळ्यातून खरंच अश्रूच आले. कारण हा चित्रपट बघणे सोपं नाही. आम्हीही ज्यू असून अशाच भय़ानकेतून गेलोय. यामुळे द काश्मीर फाईल्स इस्रायलमध्येही दाखवायला हवा, असे सांगून ते म्हणाले, कोणालाही माफी मागण्यासाठी मी बळजबरी करू शकत नाही. पण खरं सांगायच तर यावर लॅपिडने नक्कीच माफी मागायला हवी. कारण अशी वक्तव्यं करून भारतातील राजकीय वादातच त्यांनी उडी मारली आहे. वस्तुत: हे करायची त्यांना काहीही गरज नव्हती, असेही शोषणी यावेळी म्हणाले.

लॅपिड यांनी द काश्मीर फाईल्स वर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशात नवीन वाद निर्माण झाला असून यावर अनेकांनी विरोध दर्शवला तर काहीजणांनी लॅपिड यांचे समर्थन केले. लॅपिड हे इस्रायलचे असल्याने ही त्या देशाचीच भारतविरोधी छुपी भूमिका असल्याची चर्चा देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही रंगली आहे. यामुळे इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांनी तातडीने ट्वीट केले. गिलॉन यांनी लॅपिड यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला. त्यांनी लॅपिडला खुलं पत्रंच लिहले. मी तुम्हाला सर्वात शेवटची ओळख सांगतोय, ती म्हणजे लॅपिड तुम्हांला लाज वाटायला हवी. ज्या भारतीय संस्कृतीमध्ये पाहुणा हा देवस्थानी असतो. यामुळे भारतात इफ्फीसाठी तुला प्रमुख पाहुणेपदी आमंत्रित करण्यात आले. पण तू त्याचा मान न ठेवता तू भारतीयांचा विश्वास आणि सन्मान तसेच पाहुणचाराचाच अपमान केला आहेस. तुला दोन्ही देशांमधील प्रेम आणि नातेसंबंध साजरा कऱण्यास बोलवण्यात आले होते. पण तू जे काही मत मांडलंस, ते तुझं वैयक्तिक आहे, असेही गिलॉन यांनी टि्वटमधील खुल्या पत्रात म्हटले असून तब्बल ११ टि्वट करत त्यांनी लॅपिडला सुनावले आहे.

First Published on: November 29, 2022 3:05 PM
Exit mobile version