JNU मधील विद्यार्थी ३ हजारांची सिगारेट घेतात, त्यांना ६०० रु. फी वाढ नको – विनोद तावडे

JNU मधील विद्यार्थी ३ हजारांची सिगारेट घेतात, त्यांना ६०० रु. फी वाढ नको – विनोद तावडे

माजी मंत्री विनोद तावडे

“दहा रुपयांत देशात कुठेही शिक्षण मिळत नाही. फक्त जेएनयूमध्येच दहा रुपयांमध्ये शिक्षण दिले जाते. जर हीच फी ६०० रुपये केली तर त्याला फार मोठी वाढ म्हणता येणार नाही. या फी वाढीचा जे विद्यार्थ्यी विरोध करत आहेत. त्यांच्या वसतिगृहाच्या बाजुच्या स्टॉलवर हेच विद्यार्थी महिन्याचे ९ ते १० हजारांचे बिल करतात, त्यापैकी तीन हजार तर सिगारेटचे बिल होते. या जेएनयूतील विद्यार्थ्यांनी फुकट शिक्षण घ्यायचे आणि गरिबांच्या मुलाला शिक्षण मिळून द्यायचे नाही, हे चुकिचे आहे. तसेच जेएनयूमधील आंदोलन राजकीय प्रेरित असून याची चौकशी केली पाहीजे, असे वक्तव्य माजी मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत तावडे यांनी हे वक्तव्य केले आहे.

रविवारी रात्री दिल्लीमधील जेएनयू विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यानंतर देशभरात शिक्षण क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे. आज दिल्ली ते मुंबई अशा अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून या घटनेचा निषेध व्यक्त करत आहेत. अभाविपने हा हल्ला घडवून आणला गेल्याचा आरोप केला जात असतानाच आता भाजपकडून ही शक्यता फेटाळून लावली जात आहे.

जेएनयूतील या प्रकारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आज पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा निषेध केला आहे. जेएनयूतील हल्ला हा २६/११ ची आठवण करुन देणारा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच राज्यातील विद्यार्थी सुरक्षित असून त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही, असे देखील ते म्हणाले.

 

First Published on: January 6, 2020 6:09 PM
Exit mobile version