कन्हैय्याचं भाजपला आव्हान, २०१९ची निवडणूक बिहारमधून लढवणार!

कन्हैय्याचं भाजपला आव्हान, २०१९ची निवडणूक बिहारमधून लढवणार!

कन्हैय्या कुमार

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमधील कथित भारतविरोधी घोषणाबाजी प्रकरणानंतर चर्चेमध्ये आणि प्रसिद्धीच्या झोतात आलेला कन्हैय्या कुमार त्याच्या मुख्य प्रवाहातील राजकीय कारकिर्दीला लवकरच सुरुवात करणार असल्याच वृत्त सूत्रांनी दिलेलं आहे. ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्तानुसार कन्हैय्या कुमार आता मुख्य प्रवाहातील राजकारणात त्याचं नशीब आजमावणार असून येत्या वर्षी म्हणजेच २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुका तो लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, कन्हैय्या कुमार नक्की कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार? की तो स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून निवडणुकीला उभा राहणार? याविषयी अनेक चर्चा रंगताना दिसल्या होत्या मात्र, त्यावरही सूत्रांनी पडदा टाकला असून तो निवडणूक लढवणार असलेल्या पक्षाचं नाव आता समोर आलं आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – राफेलचे दर आणि काळा पैसा वाढला कसा? – कन्हैया कुमार


भारतीय कम्युनिस्ट पक्षातून लढवणार निवडणूक

कन्हैय्या कुमार भारतीय कम्युनिस्ट पक्ष अर्थात सीपीआयमधून निवडणूक लढवणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कन्हैय्या कुमार बिहारच्या बेगुलसराय लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. डाव्या संघटनांनी सार्वमताने हा निर्णय घेतल्याचं देखील सांगितलं जात आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना कन्हैय्या कुमारने ‘संविधान हाच चेहरा घेऊन भाजपसारख्या मनुवादी पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये हरवू’, असं सूचक विधान केलं होतं.

कन्हैय्या महाआघाडीचा उमेदवार

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल अर्थात राजद आणि डाव्या संघटनांच्या महाआघाडीचा कन्हैय्या उमेदवार असेल अशी माहिती बिहारचे सीपीआयचे महासचिव सत्यनारायण सिंह यांनी दिली आहे. सर्व डाव्या संघटनांचं त्याच्या उमेदवारीवर एकमत झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे कन्हैय्या कुमारच्या उमेदवारीला लालूप्रसाद यादव यांनी देखील पाठिंबा दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही सर्व माहिती समोर जरी आली असली, तरी कन्हैय्या कुमारकडून मात्र याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


तुम्ही हे पाहिलंत का? – कन्हैया कुमारचे ‘हे’ मुद्दे तुम्हालाही विचार करण्यास भाग पाडतील


कन्हैय्या भाजप उमेदवाराला देणार टक्कर!

कन्हैय्या कुमार निवडणूक लढवणार असलेल्या बिहारच्या बेगुलसराय लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचं वर्चस्व आहे. मागील निवडणुकांमध्ये भाजप उमेदवारानं प्रतिस्पर्धी उमेदवाराचा तब्बल ५८ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. २०१४मध्ये भाजपकडून भोलासिंह यांनी विजय मिळवत राजदचे उमेदवार तनवीर हसन यांना पराभूत केलं होतं. त्यामुळे कन्हैय्या कुमारसाठी ही निवडणूक मोठं आव्हान असणार आहे.

First Published on: September 2, 2018 1:08 PM
Exit mobile version