असं वागतायत जणू भूकंप झालाय, कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी सुनावलं!

असं वागतायत जणू भूकंप झालाय, कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी सुनावलं!

कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार

गेल्या ४ दिवसांपासून आख्ख्या कर्नाटकमध्ये आणि सीमा ओलांडून थेट मुंबईत जो काही राजकीय तमाशा कर्नाटकचे काँग्रेस आणि जदसेच्या बंडखोर आमदारांनी चालवला होता, त्यावर आता कर्नाटकच्या विधानसभा अध्यक्षांनी खरपूस टिप्पणी केली आहे. ‘हे आमदार असं वागत आहेत जणूकाही भूकंपच झाला आहे’, अशा शब्दांत त्यांनी राजीनामा दिलेल्या आमदारांना सुनावलं आहे. दरम्यान, हे सर्व आमदार ६ जुलै रोजी राजीनामा दिल्यानंतर ४ दिवसांनी म्हणजे गुरुवारी ११ जुलै रोजी संध्याकाळी अक्षरश: धावत पळत कर्नाटकच्या विधानसभेत दाखल झाले. त्यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी या आमदारांना सुनावलं.

‘राजीनामे तपासल्यानंतरच निर्णय घेईन’

सुट्टीनंतर परतलेल्या रमेश कुमार यांनी या आमदारांची भेट घेतली. त्यांचे आलेले राजीनामे मी व्यवस्थित तपासल्यानंतरच त्यावर योग्य तो निर्णय देईन, असं ते यावेळी म्हणाले. १३ आमदारांपैकी ८ आमदारांचे राजीनामे विहीत नमुन्यात नसल्यामुळे त्यांना पुन्हा द्यायला सांगितले आहेत. बाकीच्यांचे राजीनामे तपासूनच काय ते सांगता येईल’, असं ते म्हणाले. हे राजीनामे त्यांनी स्वखुशीने दिले आहेत की कुणाच्या दबावाखाली, हे देखील पाहावे लागेल’, असं देखील त्यांनी सांगितलं.

‘मी पळालो नाही’

दरम्यान, ६ जुलै रोजी हे आमदार राजीनामा देण्यासाठी दुपारी २ वाजता अध्यक्षांच्या कार्यालयात गेले असता रमेश कुमार दीड वाजताच तिथून गेल्याचं त्यांना समजलं. त्यावरून ‘राजीनामे स्वीकारायचे नव्हते, म्हणून अध्यक्ष पळाले’, असा दावा केला जात होता. मात्र, ‘या आमदारांनी माझी भेट मागितली नव्हती. ते येणार असल्याचं कळवलं नव्हतं. दीड वाजेपर्यंत मी चेंबरमध्येच होतो. त्यानंतर मी गेलो’, असं म्हणत रमेश कुमार यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.

‘माझ्याकडे येण्याऐवजी राज्यपालांकडे का गेलात?’

दरम्यान, त्यांना न भेटता बंडखोर आमदारांनी थेट राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले म्हणून रमेश कुमार यांनी नारीज व्यक्त केली. ‘आमदारांनी मला सांगितलं की त्यांना जीवे मारण्याची धमकी आली म्हणून घाबरून ते मुंबईला गेले. पण ते माझ्याकडे आले असते तर मी त्यांना सुरक्षा पुरवली असती. राजीनामे सादर करून तीनच दिवस झाले आणि ते असे वागत आहेत जणूकाही भूकंप झाला आहे’, असे ते म्हणाले. तसेच, ‘यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मला निर्णय घ्यायला सांगितले असून मी सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ शुटिंग केले आहे. ते मी सर्वोच्च न्यायालयाला पाठवणार आहे’, असं देखील त्यांनी सांगितलं.

४ दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून असलेल्या आमदारांनी अखेर गुरुवारी संध्याकाळी कर्नाटक विधानसभा गाठली. त्याआधी मुंबईच्या सोफीटेल आणि रेनेसन्स हॉटेलमध्ये या आमदारांनी मुक्काम ठोकला होता. त्यांना भेटलेल्या भाजप नेत्यांवरून आणि न भेटू शकलेल्या काँग्रेस नेत्यांवरून बराच गदारोळ झाला होता.


पाहा हा व्हिडिओ – कर्नाटकच्या आमदारांनी बंगळुरूला जायला हवं-मिलिंद देवरा
First Published on: July 11, 2019 8:23 PM
Exit mobile version