अपघात रोखण्यासाठी ‘जखमी’ पायांनी धावणारा देवदूत

अपघात रोखण्यासाठी ‘जखमी’ पायांनी धावणारा देवदूत

प्रातिनिधक फोटो

बरेचदा डोळ्यासमोर एखादा अपघात होऊनही काही माणसं स्वत:हून मदतीसाठी पुढे जात नाहीत. अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी तिथून सरळ काढता पाय घेतात. मात्र, इथे एक इसम असा आहे ज्याने डोळ्यांसमोर रेल्वे अपघात रोखण्यासाठी स्वत:च्या जखमी पायांनी चक्क तीन किलोमीटरपर्यंत धाव घेतली. कृष्णा पुजारी असं या देवदूताचं नाव असून त्यांनी दाखवेल्या अतुलनीय साहसामुळे अाज अनेक लोकांचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या या धाडसाचं देशभरातून कौतुक होत आहे. कृष्णा कर्नाटमधील रहिवासी असून ते रोंजदारीवर काम करतात. उपलब्ध माहितीनुसार, कृष्णा यांच्या डाव्या पायाला खूप मोठी जखम झाली आहे.

अंगावर काटा आणणारा प्रसंग…

एका स्थानिक इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, कृष्णा यांच्या पायाला दुखापत झाली असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दरररोज काहीवेळ चालण्याचा सल्ला दिला आहे. त्यादिवशीही कृष्णा नेहमीप्रमाणेच मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. रेल्वे ट्रॅकजवळून जात असताना त्यांना अचानक एके ठिकाणी रेल्वे ट्रॅकला तडा गेल्याचं लक्षात आलं. ही गंभीर बाब तातडीने रेल्वे अधिकाऱ्यांच्या कानावर घालावी या भावनेतून कृष्णा यांनी त्वरित रेल्वे कार्यालयाकडे धाव घेतली. त्यावेळी आसपास कोणतेही वाहन उपलब्ध नसल्यामुळे कृष्णा त्यांच्या जखमी पायासह धावतच निघाले. आधीच पायाला जखम झाली असताना अशाप्रकारे जोरात धावणं आणखी धोकादायक ठरणारं होतं. यामुळे जखम चिघळण्याचीही दाट शक्यता होती. मात्र, त्यावेळी कसलाच विचार या कशाचाच विचार न करता कृष्णा धावत राहिले. साधारण ३ किलोमीटर धावल्यानंतर कृष्णा रेल्वे कार्यालयामध्ये पोहचले आणि त्यांनी ट्रॅकला तडा गेल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना दिली.

हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या कृष्णा पुजारी यांना सलाम! (सौ.-storypick)

परिस्थीतचं गांभीर्य लक्षात घेत अधिकाऱ्यांनी कृष्णा यांच्यासोबत त्याठिकाठी धाव घेतली. रेल्वे ट्रॅकला गेलेला तडा मोठा असल्यामुळे त्या मार्गावरुन जाणाऱ्या दोन ट्रेन लगेच थांबवण्यात आल्या. त्यापैकी एक ट्रेन त्या जागेपासून ७ किलोमीटर अंतरावर तर दुसरी ट्रेन १६ किलोमीटर अंतरावर होती. रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम झाल्यानंतरच या दोनही रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. कृष्णा यांच्या प्रसंगावधानामुळे खूप मोठा अपघात टळला आणि हजारो लोकांचे प्राण वाचले. केवळ माणुसकीसाठी आणि दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वत:च्या दुखण्याची पर्वा न करणाऱ्या कृष्णा पुजारी यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कृष्णा एका फूट स्टॉलवर कामाला आहेत. त्यांना साधा त्यांच्या औषधांचा खर्चसुद्धा परवडत नाही. मात्र अशा सर्व परिस्थीतही आपल्या जखमी पायाचा विचार न करता त्यांनी दाखवलेलं धाडस हे वाखाणण्याजोगं आहे.


वाचा: अमिताभ बच्चन अडचणीत, बार कौन्सिलने पाठवली नोटीस

First Published on: November 3, 2018 5:01 PM
Exit mobile version