कर्नाटकच्या ‘या’ मंत्र्याला हवी फॉर्च्यूनर कार!

कर्नाटकच्या ‘या’ मंत्र्याला हवी फॉर्च्यूनर कार!

कर्नाटकचे अन्न आणि नागरि पुरवठा मंत्री बीजेड जमीर अहमद खान

कर्नाटकचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री बीजेड जमीर अहमद खान यांना कर्नाटक सरकारने दिलेली ‘इनोव्हा’ कार पसंत नाही. त्यांना लहानपणापासून महागड्या गाड्यांमध्ये फिरण्याची सवय असल्यामुळे त्यांना आता ‘फॉर्च्यूनर’ कंपनीची ‘SUV’ कार हवी आहे. कर्नाटक शासनाकडे त्यांनी तशी मागणीसुद्धा केली आहे. याच मुद्यावरुन भाजपच्या नेत्यांनी त्यांना घेरले आहे.

इनोव्हा ही खालच्या स्तराची कार – खान

खान हे व्यापारी घराण्यातून आले आहेत. त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या १०० लक्झरी बसेस आहेत. त्यांनी सांगितले की, ‘मला लहानपणापासून महागड्या गाड्यांमध्ये फिरण्याची सवय आहे. कर्नाटक सरकारकडून मला ‘इनोव्हा’ गाडी दिली, पण ‘इनोव्हा’ गाडी माझ्यासाठी आरामदायी नाही. शिवाय, ‘इनोव्हा’ गाडी ही खालच्या स्तराची गाडी आहे’.
खान यांनी सांगितले की, ‘या अगोदरच्या सरकारनेही २ ते ३ ‘SUV’ कार आपल्या मंत्र्याना दिल्या होत्या. त्यातील एक कार राज्याचे माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांना देण्यात आली होती. यापैकी एखादी चांगली कार असेल तर तीही मिळाली तरी चालेल’.

खासदार सैद हुसैन यांचे समर्थन

काँग्रेसचे नेते आणि खासदार सैद हुसैन यांनी खान यांच्या मागणीचे समर्थन केले आहे. त्यांनी सांगितले की, ‘खान यांच्या मागणीत काही गैर नाही. ते फक्त एक कार मागत आहेत’. त्याचबरोबर ते माध्यमांना म्हणाले की, ‘तुम्ही माध्यमातील लोकं नको तो विषय ताणतात. खान यांच्या मागणीत काय चुकीचे आहे? त्यांना त्या कारने प्रवास करणे जमत नव्हते. मग, त्यांनी दुसऱ्या कारची मागणी केली. यात गैर काहीच नाही’.

शासनाच्या गाडीने गेलो तरच मंत्री म्हणून ओळख – खान

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी शासकीय कामांसाठी आपली खासगी रेंज रोवर गाडी वापरतात. याबद्दल खान यांना विचारले असता, ते म्हणाले की, ‘कुमारस्वामी हे मुख्यमंत्री आहेत. ते कुठल्याही गाडीने गेले तरी लोक त्यांना ओळखतील. पण मी एक मंत्री आहे. मी माझ्या खासगी गाडीने गेलो, तर लोकं मला कसे ओळखतील? शासनाने नेमून दिलेल्या कारने गेलो तरच लोक मला मंत्री म्हणून ओळखतील’.

गरजा मर्यादित ठेवाव्यात – भाजपचे प्रवक्ते

खान यांच्या या मागणीनंतर भाजपचे प्रवक्ते एस. प्रकाश यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश यांनी सांगितले की, ‘खान यांच्या १०० बस आहेत. त्यांनी स्वत:च्या खाजगी गाड्यांमधून फिरावे. कर्नाटकात सर्वात जास्त लोक गरीब आणि मध्यमवर्गीय आहेत. खान यांनी आपल्या मागण्या मर्यादित ठेवाव्यात आणि लोकांसाठी काम करावे’.

First Published on: June 22, 2018 2:18 PM
Exit mobile version