कॉलेजमधून केले ‘निलंबित’.. तरीही बारावीत ९१ टक्के

कॉलेजमधून केले ‘निलंबित’.. तरीही बारावीत ९१ टक्के

प्रातिनिधिक फोटो

बारावीचं वर्ष म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा. बारावीत चांगले मार्क मिळवायचे असतील तर नियमीत कॉलेजला जाणं आणि मन लावून अभ्यास करणं हे क्रमप्राप्तच आहे. बारावीच्या वर्षाला आलेले विद्यार्थी देखील याच प्रयत्नात असतात. मात्र एका छोट्याशा चुकीमुळे एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेजचे अर्धे वर्ष गमवावे लागले तर? आणि असे असूनही तो अथवा ती बोर्डात अव्वल मार्कांनी उत्तीर्ण झाले तर? ही कुठल्या सिनेमाची गोष्ट नसून वास्तवात घडलेली आहे.

कॉलेजमधून निलंबीत.. तरीही बारावीत अव्वल

ही घटना आहे केरळच्या एका महाविद्यालयातील. केरळच्या महाविद्यालयात बारावी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला त्याच्या एका चुकीमुळे कॉलेजमधून चक्क निलंबीत करण्यात आलं होतं. निलंबनाच्या काळात साहाजिकच त्याला कॉलेजमध्ये येण्याची आणि शिकण्याची परवानगी नव्हती. या निलंबनामुळे बारावीचे जवळपास अर्धे वर्ष कॉलेजच्या शिक्षणापासून वंचित राहिला. मात्र असे घडूनसुद्धा केवळ मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तो विद्यार्थी यावर्षी बोर्डात अव्वल आला.थोडे-थोडके नाही तर ९१.०२ टक्के मिळवत तो बारावी उत्तीर्ण झाला. ८ पैकी ४ विषयांत त्याने A1 ग्रेड तर अन्य ४ विषयांत A2 ग्रेड पटकावली आहे.

का झाली होती शिक्षा?

मिळालेल्या माहितीनुसार, बारावीत शिकत असलेल्या त्या विद्यार्थ्याने कॉलेजमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान त्याच्या अकरावीतील मैत्रिणीला मिठी मारली. महाविद्यालयाच्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे दृष्य पाहिलं आणि त्या कृतीला गैरवर्तनाचा करार देत दोन्हीही विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून निलंबीत केलं. हे प्रकरण दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आणि स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात उचलून धरलं गेलं. याप्रकरणी स्थानिक राजकीय पक्षाकडून महाविद्यालयाच्या प्रशासनावर दबावही टाकण्यात आला. त्यामुळे अखेर महाविद्यालयाने ‘त्याला’ बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. या संधीचं सोनं करत त्या विद्यार्थ्यानेही स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं.

‘अभिमानाने ऊर भरून आला’

”बारावीत ९१ टक्के मिळवत आमच्या मुलाने स्वत:ला सिद्ध केले. त्याच्या यशामुळे आमचा ऊर भरुन आला. निलंबनामुळे त्याचे महाविद्यालयातील जवळपास ६ महिने वाया गेले होते. मात्र तरीही अभ्यासाच्या जोरावर त्याने चांगले मार्क मिळवल्याचा आम्हाला अभिमान आहे”, अशी प्रतिक्रीया त्याच्या वडिलांनी दिली.

 

First Published on: May 28, 2018 11:35 AM
Exit mobile version