निपाहच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्सेसवरच बहिष्कार

निपाहच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्सेसवरच बहिष्कार

निपाहमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह अशा प्रकारे दफन केला जातो. (सोजल्य टीओआय)

रुग्ण बरा व्हावा यासाठी डॉक्टरांइतकीच नर्सदेखील मेहनत करतात. संसर्गजन्य रोग झालेल्या रुग्णाला वाचवण्याकरता नर्स दररोज स्वत:चा जीव धोक्यात घालत असतात. मात्र, केरळमधील कोझीकोड येथील रुग्णालयात निपाह व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्सेसवर स्थानिकांनी बहिष्कार घातला आहे. या प्रकाराचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटू लागले आहेत.

भीतीपोटी घातला बहिष्कार
निपाह व्हायरसने सध्या केरळमध्ये थैमान घातले आहे. निपाहची लागण होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोझीकोड येथील पैंगबरा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्सेसवर स्थानिकांनी भीतीपोटी बहिष्कार घातला आहे.

बसमध्ये चढूही दिले नाही
गुरूवारी येथील रुग्णालयातील दोन नर्स घरी जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना त्यांना बसमधील प्रवाशांनी तीव्र विरोध केला. या नर्स बसमध्ये चढल्या तर आम्ही बसमधून उतरून जाऊ, असे प्रवाशांनी वाहक आणि चालकाला सांगितले. निपाहची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करताना या नर्सेसनाही निपाहची लागण झाली असेल आणि त्यांच्यामुळे आम्हालाही ही लागण होऊ शकते, अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली.

रिक्षाचालकांनीही केली टाळाटाळ
एकीकडे नर्सना बसमधून प्रवास करण्यास विरोध झालेला असताना दुसरीकडे रिक्षा चालकही नर्सना रिक्षात बसू देण्यास टाळाटाळ करीत आहेत. नर्सना रिक्षातून घेऊन जाण्याबद्दल रिक्षाचालकांमध्ये प्रचंड भीती आहे.
मृतदेहांचे दफन नव्हे, दहन होणार
दरम्यान, निपाह व्हायरसची लागण होऊन ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशा लोकांचे मृतदेह दफनभूमीत दफन केले जाणार नसून उपाययोजना म्हणून त्या मृतदेहांचे दहन केले जाणार आहे.

लिनी पुथ्थुसेरीचा निपाह व्हायरसची लागण होऊन मृत्यू झाला

उपचार करणाऱ्या नर्सचा दुर्दैवी अंत
केरळमधल्या प्रेरंब्रा येथील तालुका रुग्णालयात निपाहच्या उपचारांसाठी मोठ्या संख्येने रूग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी लिनी पुथ्थुसेरी ही ३१ वर्षीय नर्स कार्यरत होती. मात्र, शनिवारी तिची प्रकृती खालावली. ‘निपाह’ची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करत असताना तिलाही लागण झाल्याचा अंदाज होता. तिचा अंदाज खरा ठरला. आणि निपाहमुळे सोमवारी रात्री उशिरा तिचा दुर्दैवी मृत्यू झाला

 

 

First Published on: May 25, 2018 7:11 AM
Exit mobile version