‘क्योंकी मंत्री भी कभी ग्रेजुएट थी’; प्रियांका चतुर्वेदींचा स्मृती इराणींना टोला

‘क्योंकी मंत्री भी कभी ग्रेजुएट थी’; प्रियांका चतुर्वेदींचा स्मृती इराणींना टोला

स्मृती इराणी आणि प्रियांका चतुर्वेदी

केंद्रीय मंत्री स्‍मृती इराणी यांनी काल, गुरुवारी उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचा बालेकिल्‍ला असणार्‍या अमेठीतून लोकसभेसाठी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी आपले शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले. त्‍यावरुन स्‍मृती इराणी यांची शैक्षणिक पदवी हा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसकडून स्‍मृती इराणी यांच्‍या शैक्षणिक पदवीवरुन निशाणा साधण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. काँग्रेस नेत्‍या प्रियांका चतुर्वेदी यांनी ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा आधार घेत ‘क्योंकी मंत्री भी कभी ग्रॅजुएट थी’ म्‍हणत स्‍मृती इराणी यांच्‍या शैक्षणिक योग्‍यतेवर प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित केला आहे.

काय म्हणाल्या प्रियांका चतुर्वेदी 

काँग्रेस प्रवक्‍त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी सोशल मीडियाचा आधार घेत स्‍मृती इराणी यांच्‍यावर हल्‍ला चढवला आहे. त्‍या म्‍हणाल्‍या आहेत की, ‘क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅजुएट थी’ नावाची नवीन मालिका येणार आहे. याची सुरुवातीची ओळ अशी असणार आहे की, ‘क्वालिफिकेशन के भी रूप बदलते हैं, नए-नए सांचे में ढलते हैं। एक डिग्री आती है, एक डिग्री जाती है, बनते हलफनामे नए हैं…क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅजुएट थी.’ स्‍मृती इराणी यांनी कशापद्धतीने पदवीनंतर परत बारावीला कसे जायचे हा शिक्षणाचा नवीन दाखला दिला आहे. हे फक्‍त आणि फक्‍त मोदी सरकारच्‍या काळातच शक्‍य आहे. यासोबतच प्रियांका चतुर्वेदी यांनी स्‍मृती इराणी यांनी २००४, २०११, २०१४ च्‍या शपथपत्राचे फोटो शेअर केले आहेत.

तर स्मृती इराणी यांचा पलटवार 

दरम्यान, वारंवार होणाऱ्या आरोपांवर भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रियांका चतुर्वेदी यांच्या टीकेनंतर स्मृती इराणी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या ५ वर्षापासून विविध पद्धतीने माझ्यावर आरोप केले जात आहेत. मात्र त्यामुळे मला कोणताही फरक पडत नाही. विरोधकांना जितके आरोप करायचे आहेत, ते त्यांनी करावे. मी तितक्याच जोमाने अमेठीत काँग्रेसविरोधी प्रचार करेन.

First Published on: April 12, 2019 2:45 PM
Exit mobile version