Fodder Scam Case: लालू प्रसाद यादवांच्या अडचणीत वाढ? चारा घोटाळा प्रकरणी आज अंतिम निकाल

Fodder Scam Case: लालू प्रसाद यादवांच्या अडचणीत वाढ? चारा घोटाळा प्रकरणी आज अंतिम निकाल

देशातील प्रसिद्ध असलेल्या चारा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात सीबीआय विशेष न्यायालय अंतिम निकाल सुनावणार आहे. या घोटाळ्यात आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्यासह एकूण ९९ आरोपी आहेत. रांची येथील सीबीआयचे विशेष न्यायालय या प्रकरणी निकाल देणार आहे. त्यामुळे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे.

कोट्यवधी रूपयांच्या चारा घोटाळा संबंधित पाचपैकी चार प्रकरणांमध्ये लालू प्रसाद यादवांना आतापर्यंत दोषी ठरवण्यात आले आहे. देवगढ, चाईबासा, रांची डोरंडा ट्रेझरी आणि दुमका या चार घोटाळ्या प्रकरणांमध्ये त्यांना जामीन मंजूर झाला होता.

डोरंडा ट्रेझरीमधून बेकायदेशीररित्या पैसे काढल्याच्या प्रकरणात न्यायालयाने लालूंसह ९९ आरोपींना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. याच प्रकरणात लालू सध्या जामिनावर बाहेर आहेत. मात्र, या घोटाळ्यात अनेक धक्कादायक कारणे समोर आली आहे. सुमारे २३ वर्ष जुने हे प्रकरण १९९० ते १९९५ दरम्यान झारखंडच्या डोरंडा येथे असलेल्या ट्रेझरीमधून १३९.३५ कोटी रूपये बेकायदेशीरपणे काढण्याबाबतचे आहे.

७ ऑगस्ट २०२१ रोजी या खटल्यात फिर्यादी पक्षाच्या वतीने युक्तीवाद पूर्ण झाला. यामध्ये ५७५ साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. तर बचाव पक्षाच्या वतीने २९ जानेवारी रोजी ९९ आरोपींचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. लालू यांचाही त्यामध्ये समावेश होता. दोरांडा प्रकरणात निर्णय बाकी आहे. तसेच दुमका प्रकरणात उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर लाल सध्या तुरूंगातून बाहेर आहेत. मात्र, आज दोरांडा ट्रेझरी प्रकरणातील निर्णयासंदर्भात रांचीला पोहोचले आहेत. सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाने लालूंच्या अडचणी वाढणार की कमी होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ६ गाड्यांचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू


 

First Published on: February 15, 2022 10:16 AM
Exit mobile version