चार दशकात पहिल्यांदाच लालु यादव बिहार निवडणुक मुकणार

चार दशकात पहिल्यांदाच लालु यादव बिहार निवडणुक मुकणार

लालू प्रसाद यादव

बिहार निवडणुकांमध्ये गेल्या चार दशकांमध्ये ही पहिलीच वेळ असेल जिथे बिहारमध्ये स्टॉलवार्ट समजले जाणारे लालु यादव हे निवडणुकीसाठी प्रचार करू शकणार नाही. राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) चे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालु यादव यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात २०१८ पासून कारावास झालेला आहे. पक्षाची सुत्रे त्यांनी आपला मुलगा तेजस्वी यादवकडे दिलेली आहेत खरी पण तुरूंगातून पक्षातील घडामोडींवर ते बारीक लक्ष ठेवून आहेत.

आरजेडीचे लालु यादव यांनी वयाचे ७२ वे वर्ष गाठले आहे. झारखंड कोर्टाने आज त्यांना चारा घोटाळ्यात जामीन दिला आहे खरा, पण यापुढचा काही दिवसांचा मुक्काम मात्र तुरूंगातच असणार आहे. लालु यादव हे १९९० मध्ये झालेल्या चारा घोटाळ्यात चार वर्षांची शिक्षा भोगत आहेत. पण त्यांच्या शिक्षेचा कालावधी हा मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्येच गेला आहे. झारखंड कोर्टाने त्यांना ही शिक्षा सुनावली होती. आज झारखंड हायकोर्टानेच त्यांना चारा घोटाळ्यात जामीन मंजुर केला आहे. त्यांच्याविरोधात यापुढचे प्रकरण हे ९ नोव्हेंबरला सुनावणीला येणार आहे. जर त्या प्रकरणातही त्यांना जामीन मिळाला तरीही बिहार निवडणुकीच्या बरोबर एक दिवस आधी मिळालेला जामीन असेल. लालु यादव हे जानेवारी २०१८ पासून कारागृहात आहेत. त्यांना अनेक प्रकरणात आतापर्यंत जामीन मिळाला आहे. लालु यादव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेपैकी ५० टक्के शिक्षा त्यांनी आतापर्यंत भोगली आहे. लालु यादव हे १९७७ साली पहिल्यांदा खासदार झाले होते. गेल्या वर्षीही ते देशातल्या लोकशाही निवडणुकांना मुकले होते. त्यांनी १९९७ साली आरजेडीची स्थापना केली. सध्या तेजस्वी यांचा चेहरा पक्षाच्या विविध कॅम्पेनमध्ये वापरला जातो. नया सोच, नयी बिहार असे कॅम्पेन सध्या आरजेडीने राबवले आहे. अनेक आरोग्याच्या कारणांमुळे लालु यादव यापुढच्या काळातही निवडणुकांच्या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आता मावळली आहे.


 

First Published on: October 9, 2020 4:22 PM
Exit mobile version