माधुरी कानिटकर यांनी स्वीकारली लेफ्टनंट जनरल पदाची सूत्रे!

माधुरी कानिटकर यांनी स्वीकारली लेफ्टनंट जनरल पदाची सूत्रे!

माधुरी कानिटकर यांनी आज लेफ्टनंट जनरल पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. हे पद स्वीकारणाऱ्या माधुरी कानिटकर या तिसऱ्या महिला अधिकारी आहेत. माधुरी कानिटकर यांनी नवी दिल्लीत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या अंतर्गत असेल्या इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफचे (डीसीआईडीएस) उपप्रमुख पद आणि मेडिकल (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ)नुसार कार्यभार स्वीकारला. संरक्षण विभागाने माधुरी कानिटकर यांच्या पदोन्नतीला शुक्रवारी मंजुरी दिली होती. जनरलनंतर लेफ्टनंट जनरल हे भारतीय लष्करातील दुसरं सर्वोच्च पद आहे.

लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांचे पती राजीव हे लष्करातून लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झाले आहेत. माधुरी कानिटकर या गेल्या ३७ वर्षांपासून भारतीय लष्कराच्या सेवेत कार्यरत आहेत. गेल्या वर्षी लेफ्टनंट जनरल पदासाठी त्यांची निवड झाली होती. पण पद रिक्त नसल्याने आज त्यांना पदाची सूत्रे देण्यात आली. डॉ. कानिटकर यांनी लष्करात ३७ वर्षे सेवा केली आहे. सीडीएस-वैद्यकीय पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय लष्कराच्या तिन्ही सेवांबाबत (हवाई दल, नौदल आणि स्थलसेना) केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम त्या करतील.

कोण आहेत माधुरी कानिटकर

माधुरी कानिटकर पुण्याच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी असून त्यांना राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले होते. त्यांनी बालरोग विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रातून बालकांच्या मूत्रपिंड विकारांवर उपचाराचे प्रशिक्षण घेतले आहे. त्या पंतप्रधानांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार मंडळाच्या सदस्या आहेत. त्या लष्करी दलातील पहिल्या प्रशिक्षित बाल मूत्रपिंडविकार तज्ज्ञ आहेत. पुणे आणि दिल्लीत त्यांनी मुलांच्या मूत्रपिंड विकारावर उपचारासाठी केंद्रे स्थापन केली आहेत. २०१७ मध्ये त्या पुण्याच्या आम्र्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या पहिल्या अधिष्ठाता होत्या. तेथे दोन वर्षे काम केल्यानंतर त्यांनी उधमपूर येथे मेजर जनरल (वैद्यकीय) पदाची जबाबदारी स्वीकारली.

First Published on: March 1, 2020 10:06 AM
Exit mobile version