नशीबवान! ३० फुट उंचीवरुन खाली कोसळला चिमुकला आणि…

नशीबवान! ३० फुट उंचीवरुन खाली कोसळला चिमुकला आणि…

चिमुकला कोसळला ३० फूटांवरुन, सीसीटीव्ही व्हायरल

लहान मुलांना खेळत असताना एकटं सोडू नका किंवा त्यांच्याकडे लक्ष द्या असं सांगितलं गेलं तरी अनेकदा पालकांकडून दुर्लक्ष होतं आणि होत्याचं नव्हतं होतं. असाच एक प्रकार मध्यप्रदेशमधील टीकमगड येथे घडला आहे. तब्बल तीस फूट उंच इमारतीवरुन खाली कोसळलेल्या चिमुकल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतआहे.

हा व्हिडीओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकलाच म्हणून समजा. पण, थोड्या वेळाने पुन्हा हा व्हिडीओ पाहिलात तर तुम्हाला काहीसा दिलासा देखील मिळेल. एक मुलगा फार उंचीवरुन खाली कोसळल्याचं या व्हिडीओत दिसतंय. पण,  तब्बल दुसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळलेल्या मुलाला जास्त काही दुखापत झाली नव्हती. कारण, हा मुलगा जेव्हा खाली कोसळला तेवढ्यात त्या इमारतीखाली एक रिक्षावाला येऊन उभा राहिला. हा मुलगा रिक्षामध्ये जाऊन आदळला. त्यामुळे, हा मुलगा अगदी सुखरुप आहे. इतक्या उंचावरुन पडूनही चिमुकला सुरक्षित असल्याचं कुटुंबियांना कळताच त्यांचा जीव भांड्यात पडला.

नेमकं काय घडलं?

पर्व जैन असं या तीन वर्षांच्या मुलाचं नाव आहे. हा मुलगा बाल्कनीत खेळत होता. पण, खेळताना काही कळायच्या आतच तो बाल्कनीतून थेट खाली कोसळला. त्याच वेळी इमारतीखाली एक रिक्षावाला आला. त्या रिक्षात हा मुलगा कोसळून आदळला. सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही. या मुलाला त्यांच्या वडिलांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या मुलाची आता प्रकृती स्थिर आहे.

वडीलांनी रिक्षाचालकाचे मानले आभार –

हा प्रसंग घडल्यानंतर वडीलांनी रिक्षाचालकाचे आभार मानले आहेत. जर रिक्षाचालक देवासारखा धावून नसता आला तर आज मोठा अनर्थ घडला असता असं म्हणत चिमुकल्याच्या वडिलांनी आभार मानले. पर्व बाल्कनीत खेळत असताना अचानक तोल जावून थेट खाली कोसळला. त्याचवेळी रिक्षावाला जात होता म्हणून पर्वचे प्राण वाचले. असं म्हणत त्याचे वडील भावुक झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून पालकांच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.

First Published on: October 20, 2019 7:07 PM
Exit mobile version