लॉकडाऊन योग्यच पण लोकांच्या रोजीरोटीचे काय?; काँग्रेसचा सवाल

लॉकडाऊन योग्यच पण लोकांच्या रोजीरोटीचे काय?; काँग्रेसचा सवाल

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन कालावधी वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत ३ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आल्याचं जाहिर केलं. दरम्यान, आता विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली आहे. लॉकडाऊनच्या निर्णयाचे कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी कौतुक केलं आहे. परंतु त्यांनी आर्थिक पॅकेज नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, लॉकडाऊन वाढेल, याबद्दलची माहिती नागरिकांना होती, यात काही नवीन नाही. लॉकडाऊन वाढवणे देशासाठी आवश्यक आहे, देशाला वाचवणं सर्वात महत्वाचं आहे, असं अधीर रंजन चौधरी म्हणाले.


हेही वाचा – Lockdown: २१ दिवसांत ८ लाख कोटींचं नुकसान


कॉंग्रेस नेते म्हणाले की, पंतप्रधानांनी गरीब व मागासवर्गीयांबद्दल विचार करायला हवा होता, छोट्या उद्योगांना दिलासा मिळायला हवा होता. आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी उद्योजकांची मागणी आहे. सरकार आर्थिक पॅकेजला इतका उशीर का करत आहे? यासह लॉकडाऊन वाढवण्याबाबत कॉंग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचं कौतुक केलं पण आर्थिक पॅकेजचा मुद्दाही उपस्थित केला. अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्विटरवर लिहिलं की, “पंतप्रधानांचे भाषण प्रेरणादायक होते, परंतु कोणत्याही आर्थिक पॅकेजची घोषणा नाही, अचूक माहिती नाही. गरीब किंवा मध्यमवर्गीय किंवा व्यापारी यांनी कोणत्याच पॅकेजची घोषणा नाही, लॉकडाऊन योग्य आहे, पण लोकांच्या रोजीरोटीचे काय?”

 

First Published on: April 14, 2020 12:01 PM
Exit mobile version