Lok Sabha : बॅलेट पेपर संदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Lok Sabha : बॅलेट पेपर संदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

नवी दिल्ली : व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) स्लिप्सद्वारे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनद्वारे (EVM) टाकलेल्या मतांची संपूर्ण पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (26 एप्रिल) फेटाळल्या आहेत. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. (Lok Sabha Election 2024 court rejected ballot paper petition Narendra Modi attacked the opponents)

बिहारमधील अररिया येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने विरोधकांच्या तोंडावर चपराक बसली आहे. आता ते स्वत:चे तोंड वर करून बघू शकत नाहीत. आजचा दिवस लोकशाहीसाठी शुभ आहे. जुने युग परत येणार नाही. त्यामुळे इंडिया आघाडीच्या प्रत्येक नेत्याने देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी मोदींनी केली.

विरोधकांवर निशाणा साधताना नरेंद्र मोदी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे काही लोकांच्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाला आहे. बॅलेट पेपर पुन्हा येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. परंतु काही लोकांकडून ईव्हीएमला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. कारण आज संपूर्ण जग भारताच्या लोकशाहीचे, भारताच्या निवडणूक प्रक्रियेचे आणि निवडणुकीतील तंत्रज्ञानाच्या वापराचे कौतुक करत असताना हे लोक आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी ईव्हीएमची बदनामी करण्यात व्यस्त होते. लोकशाहीशी गद्दारी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला गेला, असा आरोप मोदींनी केला.

 हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : देशात EVMवरच होणार मतदान; बॅलेट पेपर संदर्भातील याचिका SCने फेटाळल्या

सर्वोच्च न्यायालयाकडून जनतेला न्याय (Justice to the people by the Supreme Court)  

मोदी म्हणाले की, इंडिया आघाडीच्या प्रत्येक नेत्याने ईव्हीएमबाबत जनतेच्या मनात शंका निर्माण करण्याचे पाप केले आहे, परंतु आज देशाच्या लोकशाहीची आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद पाहिली तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्याय दिला आहे. मतदान केंद्र आणि मतपेट्या लुटण्याच्या इराद्याने जनतेला धक्का बसला असून त्यांच्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाला होता. इंडिया आघाडीला ना देशाच्या संविधानाची पर्वा आहे ना लोकशाहीची. त्यामुळे या लोकांनी बॅलेट पेपरच्या नावाखाली अनेक दशके जनतेचा आणि गरिबांचा हक्क हिसकावून घेतला, असेही मोदी म्हणाले.

निवडणूक आयोगाला दिलासा

दरम्यान, आज झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने देशातील निवडणुका या ईव्हीएम मशीनवरच होणार असल्याचा निर्णय दिला आहे. बॅलेट पेपर तसेच ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट यांच्या पडताळणी बाबतच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला दिलासा मिळाला असून याचिकाकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024: TMC खोटं बोलतंय, CAA हा नागरिकत्व देणारा कायदा; मोदींचं स्पष्टीकरण

Edited By – Rohit Patil

First Published on: April 26, 2024 4:06 PM
Exit mobile version