Rokhthok : मोदींनी बाळासाहेबांनाच खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला, संजय राऊतांचे टीकास्त्र

Rokhthok : मोदींनी बाळासाहेबांनाच खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला, संजय राऊतांचे टीकास्त्र

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांपूर्वी चंद्रपुरात आले आणि त्यांनी सांगितले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असून तेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे.” शिवसेना कोणाची? हे मोदी ठरवू शकत नाहीत. उद्याच्या लोकसभा निवडणुकीत जनताच त्याचा निर्णय करेल. उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असे सांगताना मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांनाच खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला, असे टीकास्त्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Lok Sabha Election 2024 : Sanjay Raut taunts Modi about real and fake Shiv Sena)

नरेंद्र मोदी यांच्या हातात अमर्याद सत्ता एकवटली आहे आणि निवडणूक आयोगास दबावाखाली आणून त्यांनी शिवसेना शिंदेंच्या ताब्यात दिली. मोदी आणि त्यांच्या लोकांनी केलेली ही लबाडी आहे. चंद्रपुरात शिंदे हे मोदी यांच्या व्यासपीठावर होते आणि शिंदे यांच्या गळ्यात भाजपाचे उपरणे होते. त्यामुळे नकली शिवसेना ही मोदी यांच्या बाजूलाच शरणागत अवस्थेत उभी होती, अशी टिप्पणी खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या रोखठोक या कॉलममध्ये केली आहे.

शिंदेंच्या गळ्यात भाजपाचा पट्टा

शिंदे हे बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत असे सांगणे म्हणजे शिवसेनेच्या स्वाभिमानी संघर्षाचा अपमान आहे. उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मागण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ‘मातोश्री’वर गेले होते. 2014 आणि 2019 साली मोदी हे पंतप्रधान होण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याच पाठिंब्याचे पत्र भाजपाने घेतले होते. तेव्हा शिंदे हे शिवसेनेच्या मुख्य वर्तुळात नव्हते. आज त्यांच्या गळ्यात भाजपाचा पट्टा घातला आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.

बाळासाहेबांच्या विचारांचे वाहक कसे ठरणार?

एकनाथ शिंदे यांनी लढून काहीच मिळवले नाही. भाजपापुढे शरणागती पत्करून आजचे स्थान मिळवले. हे असे लोक बाळासाहेबांच्या विचारांचे वाहक कसे ठरणार? ज्यांना मोदी ‘खरी शिवसेना’ अशी उपाधी बहाल करतात त्या शिवसेनेच्या उमेदवारांचा पत्ता कट करण्याचे काम भाजपाने केले. शिंदे यांच्या माणसांना उमेदवाऱ्या द्यायच्या की नाही, हे भाजपा ठरवत आहे आणि गळ्यात भाजपचा पट्टा घातलेले शिंदे गप्प आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

शिंदे गटाचे काय होणार?

एकनाथ शिंदे हे शिवसेना नाहीत, हे मोदी यांच्या पक्षानेच दाखवून दिले. लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे आणि त्यांच्या गटाचे काय होणार? हे सांगता येत नाही. शिंदे आणि त्यांच्या लोकांत लढण्याचे बळ नाही. पैसा हेच सर्वस्व आणि त्याच्या जोरावर राजकारण करता येते, असे वाटणाऱ्यांपैकी मोदी-शहा आहेत. शिंदे हे त्याच विचारांचे असल्याने त्यांचे मोदी-शहा यांच्याशी जमले, पण हा विचार शिवसेनेचा असू शकत नाही, असे ठामपणे खासदार राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – PM Modi : योद्ध्यांना कोठडीत डांबून मोदींची मैदानात तलवारबाजी, संजय राऊतांची रोखठोक टीका

First Published on: April 14, 2024 12:53 PM
Exit mobile version