घरदेश-विदेशLok Sabha Election 2024 : हा तर उफराटा न्याय; उद्धव गटाची निवडणूक...

Lok Sabha Election 2024 : हा तर उफराटा न्याय; उद्धव गटाची निवडणूक आयोगावर टीका

Subscribe

Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना नोटीस बजावली. यावरूनच आता उद्धव गटाने 'सामना' अग्रलेखातून निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

मुंबई : काँग्रेसच्या राजवटीत तुमचे मंगळसूत्र सुरक्षित नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीगढ येथील सभेत केला. माता-भगिनींच्या सोन्याचे मोजमाप करणार असल्याचे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. तुमच्याकडील सगळ्या गोष्टींची माहिती ते घेतील आणि नंतर त्या मालमत्तेचे वाटप करतील, असेही मोदी या प्रचार सभेत म्हणाले होते. यानंतर निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना नोटीस बजावली. यावरूनच आता उद्धव गटाने ‘सामना’ अग्रलेखातून निवडणूक आयोगावर टीका केली आहे. (Lok Sabha Election 2024 Shivsena  UBT slams election commission PM Modi statement on mangalsutra and congress menifesto)

स्वार्थासाठी मंगळसूत्रावर चिखलफेक

मोदी आणि त्यांचे लोक हे सत्तेवर बसलेले आयतोबा आहेत. म्हणूनच त्यांनी पवित्र मंगळसूत्राची उठाठेव करण्याचा प्रयत्न केला. भारतमातेच्या गळ्यातही क्रांतिकारकांच्या बलिदानाचे, त्यागाचे मंगळसूत्र आहे. त्या मंगळसूत्रातील एकही मणी मोदीकृत भाजपचा नाही. मोदी यांनी त्यांच्या स्वार्थासाठी पवित्र मंगळसूत्रावर चिखलफेक करून हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्माचा अपमान केला. त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, पण निवडणूक आयोगाचा न्यायच उफराटा. मंगळसूत्रास हात घातला मोदींनी आणि आयोगाने कारवाईचा बडगा उगारला नड्डांवर. भाजपचा ‘नाडा’ सुटल्याचेच हे द्योतक आहे.

- Advertisement -

मतदारांची भाजपाकडे पाठ

भाजप आणि काँग्रेसला निवडणूक आयोगाने नोटिसा बजावल्या आहेत. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या नावे आयोगाने नोटीस बजावली. आचारसंहितेच्या उल्लंघनाचे हे प्रकरण आहे. भांडणात एकमेकांविरुद्ध तक्रार म्हणजे ‘क्रॉस कम्प्लेन्ट’चा हा प्रकार असला तरी पंतप्रधान मोदी यांच्याबाबत नोटीस म्हणजे धूळफेक आहे. धूळफेक यासाठी म्हणायची की, पंतप्रधान मोदी यांनी ‘मुसलमान समाजा’विषयी एक धादांत खोटे वक्तव्य केले. काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करून मोदी यांनी बांग दिली की, काँग्रेस सत्तेवर आली तर हिंदूंची संपत्ती ते जास्त मुले असलेल्यांना वाटतील. म्हणजे हिंदूंच्या संपत्तीचे वाटप मुसलमानांत केले जाईल. तुमची मंगळसूत्रेही खेचली जातील, अशा पद्धतीचे वक्तव्य करून मोदी यांनी प्रचारात हिंदू-मुसलमान हा मुद्दा आणलाच. मोदींना प्रचारात मुसलमानांना खेचावे लागले याचा अर्थ निवडणूक त्यांना जड जात आहे. पहिल्या – दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे जो मुद्दा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नाही तो मुद्दा घेऊन मोदी यांनी थापेबाजी केली. या मुद्द्यावर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने मोदी यांना नोटीस न बजावता भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना नोटीस बजावली. निवडणूक आयोगाची ही पद्धत योग्य नाही. पंतप्रधानपदावरील व्यक्ती जातीय आणि धार्मिक विधाने करून मते मागत असेल तर तिच्यावरही निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करायलाच हवी, इथे मात्र तसे घडताना दिसन नाही, अशी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024 Shivsena  UBT slams election commission PM Modi statement on mangalsutra and congress menifesto)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -