Lok Sabha 2024 : ही चंदीगडचीच पुनरावृत्ती; पंतप्रधान मोदींवर उद्धव गटाचा हल्लाबोल

Lok Sabha 2024 : ही चंदीगडचीच पुनरावृत्ती; पंतप्रधान मोदींवर उद्धव गटाचा हल्लाबोल

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान लवकरच होणार आहे. एकूण सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होईल. पण त्यापूर्वीच गुजरात आणि देशात भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. गुजरातच्या सुरतमध्ये काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद ठरला तर, उर्वरित आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले. ही चंदीगडमधील महापौर निवडणुकीची पुनरावृत्ती असल्याची टीका उद्धव गटाने ‘सामना’ अग्रलेखातून पंतप्रधानांवर केली आहे. (Lok Sabha Election 2024 surat lok sabha constituency victory of bjp candidate narendra modi dictectorship)

गुजरातमधील ‘सुरत’ लोकसभा जागा भाजपने ज्या पद्धतीने बिनविरोध जिंकली ही एक प्रकारे लोकशाहीची लूट आणि बळजबरीच आहे. भाजपने विजयाचे खाते अशा प्रकारे उघडले. हा सर्वच प्रकार संशयास्पद आणि धक्कादायक आहे. ‘सुरत’ प्रकरणात जे घडले ती एक प्रकारे चंदिगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीचीच पुनरावृत्ती आहे. चंदिगडमध्ये भाजपने मतपत्रिका लुटल्या होत्या, सुरतमध्ये विरोधी उमेदवार एक तर बाद केले किंवा निवडणुकीच्या रिंगणातून गायब केले. चंदिगडमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने आपल्या विरोधातल्या मतपत्रिकाच बाद केल्या, पण सर्वोच्च न्यायालयाने लोकशाही रक्षणासाठी कठोर भूमिका घेतल्याने भाजपचा मुखवटा ओरबडून निघाला. सुरतमध्ये सत्तेची दहशत निर्माण करून सर्व विरोधी उमेदवारांना निवडणुकीतून हटवले. देशाला आज भयानक दिव्यातून जावे लागत आहे. लोकशाहीचे हाल काय आहेत हे ‘सुरत’ लुटमार प्रकरणात दिसून आले. भाजपला संविधान बदलायचे आहे आणि त्यासाठी लागणारा खासदारांचा आकडा ‘सुरत’ मार्गाने मिळवला जात आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : हा तर गैरमार्गाने मिळवलेला विजय; उद्धव गटाचा पंतप्रधानांवर हल्ला

सुरत हा भारतीय लोकशाहीचा कत्तलखाना

शिवसेनेचे आमदार आणि खासदार पळवून आधी सुरतलाच नेले. तिथे खोक्यांचे व्यवहार पार पडल्यावर हे सगळे खोकेबाज गुवाहाटीस पोहोचले. त्यामुळे सुरत हा भारतीय लोकशाहीचा कत्तलखाना बनला आहे. सुरत गुजरातमध्ये आहे हे नाकारता येत नाही. भारतीय लोकशाही हा जनावरांचा बाजार करून त्या जनावरांचा बाजार सुरत येथे भरवण्यात मोदी-शहांचा पुढाकार आहे. सुरतचे प्रकरण साधे नाही आणि संपूर्ण देशात त्यावर चर्चा व्हायला हवी. देशात काय घडते आहे हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. लोकशाहीतील तो पहिला धडा असतो, परंतु आपल्या सरकारने लोकशाहीच्या सर्व प्राथमिक मूल्यांवरच आघात केला आहे. सुरतमध्ये मी लोकशाही पद्धतीने जिंकलो, असा दावा भाजपचे विजयी उमेदवार मुकेश दलाल यांनी केला. सर्व उमेदवारांना दहशतीच्या मार्गाने ‘बाद’ करून स्वतःला विजयी घोषित करून घ्यायचे ही लोकशाही भारतीय संविधानाची नसून मोदीकृत भाजपची आहे. मोदी यांनी देशाचे संविधान सध्या मृत केले आहे आणि आपल्या न्यायव्यवस्थेचे डोकेच निखळल्यासारखे झाले आहे. (Lok Sabha Election 2024 surat lok sabha constituency victory of bjp candidate narendra modi dictectorship)

देशाची लोकशाही, स्वातंत्र्याचे थडगे गुजरातमध्ये

चंदिगडच्या महापौर निवडणुकीत भाजपने जे केले ती चक्क लबाडी होती आणि आता ‘सुरत’च्या निवडणुकीत जे केले त्यास लोकशाहीवरचा दरोडाच म्हणावा लागेल. मोदी यांना सत्ता सोडायची नाही. 4 जूनला त्यांचा पराभव होताच ते संसदेचा ताबा झुंडशाही पद्धतीने घेतील हे आता स्पष्ट दिसते. सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा गैरमार्गाने मिळवलेला विजय हीच मोदींची लोकशाही. देशाला ती मान्य नाही. लोकसभेत भाजपने खाते उघडले असे त्यावर सांगितले गेले. प्रत्यक्षात मोदी यांनी अशा पद्धतीने हुकूमशाहीचेच खाते उघडले व त्याची सुरुवात गुजरातमधून केली. मोदींच्या काळात गुजरात सर्वाधिक बदनाम झाला. देशाच्या लोकशाही, स्वातंत्र्याचे थडगेच जणू गुजरातमध्ये बांधले. पैशाच्या आणि सत्तेच्या बळावर आपण हवी तशी मनमानी करू शकतो हा गुजरातचा ‘माज’ देशाला मान्य होणारा नाही. मोदी आणि शहांमुळे हा माज वाढला असेल तर मोदी-शहांचा पराभव आता अटळ आहे, हे या व्यापारी मंडळाने विसरू नये. मोदी नावाचा एक माणूस देशाच्या पंतप्रधानपदी आला आणि गेला याचे स्मरणही देशाला राहणार नाही. ‘सुरत’ प्रकरणानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचेही यात शेवटी म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024 surat lok sabha constituency victory of bjp candidate narendra modi dictectorship)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

First Published on: April 24, 2024 3:24 PM
Exit mobile version