लोकसभेत काँग्रेसचं संख्याबळ अजून घटलं, ७ खासदार निलंबित!

लोकसभेत काँग्रेसचं संख्याबळ अजून घटलं, ७ खासदार निलंबित!

आधीच लोकसभेत अल्पसंख्य ठरलेल्या काँग्रेस पक्षासमोर आता नवा पेच निर्माण झाला आहे. दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणावरून लोकसभेमध्ये गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या ७ आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर अधीच अल्पसंख्य ठरलेल्या काँग्रेस पक्षाचं अधिवेशनातलं संख्याबळ अजूनच खाली आलं आहे. आता या सातही खासदारांना पूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन काळासाठी कामकाजात सहभागी होता येणार नाही. या खासदारांमध्ये गौरव गोगोई, टीएन प्रथापन, डीन कुरियाकोसे, आर उन्निथन, माणिकम टागोर, बेनी बेहनन आणि गुरजितसिंग औजला यांचा समावेश आहे.

हिंसाचारात अनेक मृत्यू

गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीच्या पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. यामध्ये ४५ हून जास्त लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या समर्थनासाठी आणि विरोधासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये हे बळी गेले असून १०० हून जास्त आंदोलक जखमी झाले आहेत. अजूनही इथल्या काही भागांमधून मृतदेहांचा शोध सुरू आहे.

आता काँग्रेसची काय असेल रणनीती?

दरम्यान, या मुद्द्यावरून विरोधकांनी लोकसभेचं आजचं काम सुरू होताच गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी कामकाज वारंवार तहकूब करावं लागत होतं. काही काँग्रेस आमदारांनी सभापतींच्या हातून पत्र काढून घेतल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सभागृहात गैरवर्तणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आता या ७ खासदारांच्या शिवाय लोकसभेमध्ये काँग्रेस कशा पद्धतीने आक्रमक होणार? हा प्रश्न काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींना पडला आहे.

First Published on: March 5, 2020 5:46 PM
Exit mobile version