कलम ३७० रद्द; यंदा जम्मू-काश्मीरमध्ये ‘बॉर्डरचा राजा’ दिमाखात बसणार

कलम ३७० रद्द; यंदा जम्मू-काश्मीरमध्ये ‘बॉर्डरचा राजा’ दिमाखात बसणार

बॉर्डरचा राजा

जम्मू आणि काश्मीरला विशेष सवलत देणारे घटनेतील कलम ३७० रद्द केल्यानंतर आता सीमेवर गणेशोत्सव साजरे करण्याचे वेध तेथील नागरिकांना लागले आहे. बॉर्डरवर सुरक्षा आणि शांती टीकून राहावी तसेच सैनिकांच्या जीविताचे रक्षण व्हावे, यासाठी जम्मूतील रहिवासी किरण इशर यांनी यावर्षी आपल्या घरी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खास मुंबईहून त्या तीन गणेश मुर्ती जम्मू-काश्मीरला घेऊन जाणार आहेत.

जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात राहणाऱ्या किरण इशर या मागच्या तीन वर्षांपासून लाईन ऑफ कंट्रोलवर (LOC) गणपती बसवत आहेत. यावर्षी त्यांनी मुंबईहून साडे सहा फुटांची मुर्ती घेतलेली आहे. ज्याला त्या ‘भारत-पाकिस्तान बॉर्डरचा राजा’ म्हणतात. लाईन ऑफ कंट्रोलजवळ या मुर्तीची प्रतिष्ठापना करत गणेशोत्सव साजरा केला जाईल. किरण यांनी गणेशमुर्ती घेऊन सोमवारी मुंबईतून प्रस्थान केले. स्वराज एक्सप्रेसमधून त्यांनी गणपतीच्या मुर्ती नेल्या आहेत.

 

आपल्या उपक्रमाबाबत किरण इशर म्हणाल्या की, “सध्या सीमेवर तणाव आहे. सर्वकाही सुरळीत होण्यासाठी आणखी काही अवधी लागणार आहे. आम्ही दहा दिवसांसाठी गणपती बसवत असून यामुळे सैनिकांमध्ये नक्कीच उत्साह निर्माण होईल. तसेच या सार्वजनिक गणेशोत्सवातून आम्ही प्रेम आणि बंधुभाव वाढीस लागावा यासाठीही प्रयत्न करणार आहोत.”

हा गणेशोत्सव स्थानिकांच्या पाठिंब्यावर साजरा केला जातो. सैन्यदलातील जवान, अधिकारी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येतात. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते, असेही इशर यांनी सांगितले.

First Published on: August 27, 2019 1:35 PM
Exit mobile version