शाब्बास रे उंदरा; हजारो लोकांचे प्राण वाचविल्याबद्दल मिळालं ‘गोल्ड मेडल’

शाब्बास रे उंदरा; हजारो लोकांचे प्राण वाचविल्याबद्दल मिळालं ‘गोल्ड मेडल’

मगावा उंदराला मिळालं गोल्ड मेडल

अतुलनीय शौर्य दाखविल्याबद्दल एका उंदराला सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले आहे. आता तुम्ही म्हणाल की, काहीही काय सांगता? पण हे खरं घडलंय. आफ्रिकन प्रजातीच्या एका उंदराने अजब कारनामा करुन दाखवला आहे. त्याबद्दल ब्रिटनच्या एका संस्थेने उंदराच्या गळ्यात गोल्ड मेडल घातले. या उंदराने आपल्या वास घेण्याच्या क्षमतेचा वापर करत कंबोडियामध्ये ३९ भूसुरुंग (Landmine Detection) शोधून काढले आहेत. तसेच २८ जिवंत सुरुंग शोधून काढत त्याने हजारो लोकांचा जीव वाचवला आहे. आफ्रिकेची Giant African pouched rat प्रजातीच्या उंदराचे नाव मगावा (Magawa) असे आहे. theguardian या संकेतस्थळाने याबाबत वृत्त प्रसारीत केलेले आहे.

ब्रिटनच्या पीडीएसए (PDSA) या संस्थेने शुक्रवारी या उंदराच्या कामावर आनंद व्यक्त करत त्याला सुवर्णपदक बहाल केले. मगावाला या कामासाठी पीडीएसए सोबत काम करणाऱ्या APOPO या संस्थेने प्रशिक्षित केले होते. संस्थेने हा पुरस्कार देत असताना सांगितले की, मगावाने कंबोडियामधील २० फुटबॉल मैदाना एवढ्या क्षेत्रावरील स्फोटके असलेले भूसुरुंग शोधून काढले आहेत. त्यामुळे अनेकांचे जीव वाचलेले आहेत.

मगावाचे वजन १.२ किलो असून तो जेव्हा सुरुंगावरुन जातो तेव्हा त्याच्या हलक्या वजनामुळे सुरुंगाचा स्फोट होत नाही. मगावाने आपले प्रशिक्षण मोठ्या खुबीने पुर्ण केले होते. तो अर्ध्या तासात एक टेनिस कोर्ट एवढा परिसरावर फिरून गंधाद्वारे सुरुंगाचा माग काढतो. जर याच कामाची तुलना मनुष्यासोबत केली, तर बॉम्ब डिटेक्टर घेऊन एका व्यक्तिला एवढेच क्षेत्र पुर्ण करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. तसेच मनुष्याच्या वजनामुळे सुरुंगाचा स्फोट होण्याचा धोका असतोच.

उंदरांना प्रशिक्षण देणारी APOPO ही संस्था बेल्जियम या देशातील असून ती आफ्रिकेच्या टांझानिया येथे काम करते. १९९० पासून ही संस्था मगावा सारख्या उंदरांना ट्रेनिंग देण्याचे काम करत आहे. एका उंदराला पुर्ण ट्रेनिंग देण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. त्यानंतर संबंधित उंदराला हिरो अशी उपाधी दिली जाते. पुर्ण प्रशिक्षित झाल्यावर हे उंदीर स्निफर डॉग प्रमाणे काम करतात.

कंबोडियामध्ये १९७० ते १९८० या दशकात भयंकर गृहयुद्ध छेडले गेले होते. यादरम्यान शत्रूवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भूसुरुंग पेरण्यात आले होते. आता गृहयुद्ध संपले आहे, मात्र हे जुने भूसुरुंग अजूनही लोकांचे प्राण घेत आहेत. एका NGO ने दिलेल्या माहितीनुसार भूसुरुंगाच्या स्फोटामुळे १९७९ पासून आतापर्यंत ६४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच २५ हजाराहून अधिक लोकांना अंपगत्व आले आहे.

First Published on: September 25, 2020 9:44 PM
Exit mobile version