प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

प्रिया प्रकाश वारियर

मलयालम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. आपल्यान नजरेने घायाळ करणाऱ्या प्रिया वारियरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगालाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओला लाखो हिट्स आणि शेअर मिळाले होते. या व्हिडिओमुळे प्रिया वारियर खूप चर्चेत आली होती. तिच्या या व्हिडिओमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे हैद्राबाद आणि मुंबईमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रिया वारियारच्या या व्हिडिओचे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात पोहचले होते. आज झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने तक्रारकर्त्यांना चांगलेच फटकारले आहे. ‘तुम्हाला काही काम धंदे आहेत की नाही’ असा सवाल सुप्रीम कोर्टाने केलाय.

धार्मिक भावना दुखावल्याने कोर्टात धाव

१३ फेब्रुवारीला प्रिया वारियरचे ‘ओरु अदार लव’ हे मल्ल्याळम चित्रपटातील गाणे रिलीज झाले होते. या गाण्यामध्ये प्रिया डोळा मारताना दिसत आहे. याच गाण्यावरुन मोठा वाद झाला होता. ते गाणे केरळच्या मालाबार भागातील एक पारंपारिक मुस्लिम गाणे आहे. हे गाणे पैगंबर मोहम्मद आणि त्यांची पहिली पत्नी खदीजा यांच्या प्रेमाचे वर्णन आणि प्रशंसा करते. हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तेलंगणामधील रजा अकादमी आणि जन जागरण समितीने मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्याचे सांगत प्रिया वारियरविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली.

याचिकाकर्त्यांना कोर्टाने फटकारले

हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात पोहचले. या गाण्यावर बंदी आणून प्रियासह चित्रपटातील संबंधित लोकांवर कारवाई करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. अशाप्रकारे डोळे मारणाऱ्यावर इस्लाममध्ये बंदी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रिया वारियरविरोधात हैद्राबाद पोलिसांनी गुन्हा देखील दाखल करुन घेतला होता. आज याप्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावले. तुम्हाला काही काम धंदे आहेत की नाही असा सवाल केला. त्यानंतर कोर्टाने प्रियासह चित्रपटाच्या दिग्दर्शक, कलाकार आणि निर्मात्यांवर दाखल केलेली तक्रार मागे घेण्यास सांगितले.

First Published on: August 31, 2018 8:09 PM
Exit mobile version