Mamata Banerjee : आम्ही विरोधक नाही, आम्ही या देशातलेच आहोत; ममतांचा भाजपला टोला

Mamata Banerjee : आम्ही विरोधक नाही, आम्ही या देशातलेच आहोत; ममतांचा भाजपला टोला

 

पाटणाः आम्हाला विरोधक म्हणू नका. आम्ही या देशातलेच आहोत. भारतमाता आमचीही आहे. आम्हीदेखील देशप्रेमी आहोत. मणिपूर जळताना आम्हालाही त्रास होतो, असा टोला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी भाजपला लगावला.

पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर सर्व प्रमुख नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, बैठकीत तीन प्रमुख मुद्द्यांवर आमचे एकमत झाले. आम्ही एकत्र आहोत. आम्ही एकत्र लढणार आहोत. भाजप ज्या काही चुकीच्या गोष्टी करेल त्याविरोधात आम्ही एकत्र संघर्ष करु.

हेही वाचाःराहुल गांधींचा लग्नाला होकार; वडिलकीच्या नात्याने भर पत्रकार परिषदेत लालू यादव यांनी मांडला प्रस्ताव

इतिहासाची सुरुवात पाटणातून झाली

दिल्लीत विरोधी पक्षनेत्यांच्या अनेक बैठका झाल्या. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे ही बैठक पाटणा येथे आयोजित करण्यात आली. ही बैठक यशस्वी झाली आहे. पाटणातून जे सुरु होते त्याचे पुढे जनआंदोलन होते. त्याची सुरुवात आज झाली आहे. भाजप इतिहास बदलत आहे. पण इतिहासाची खरी सुरुवात पाटणा येथून झाली आहे, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.

भाजपची हुकुमशाही मोडीत काढणार

महिला आणि दलित अत्याचार वाढले आहेत. सामान्य नागरिकांची भाजपला चिंता नाही. सर्वकाही मनमानी कारभार सुरु आहे. पश्चिम बंगालचा स्थापना दिवस भाजपने जाहीर केला. आम्हाला विचारले पण नाही. कुलगुरुंची निवड हे थेट करतात, कोणाला काही विचारत नाही. भाजपची ही हुकुमशाही मोडीत काढायची आहे. रक्त सांडले तरी आम्ही लढणार आहोत. कारण भाजप पुन्हा सत्तेत आली तर निवडणुका होणार नाहीत, अशी भीती ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली.

चालाखीने विरोधकांना अडकवले जाते

कोणी विरोधात बोललं की त्याच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते. चालाखी करुन वकीलांची फौज पाठवली जाते. एखाद्या प्रकरणात अडकवले जाते. ही भाजपची खेळी आहे. ही खेळी मोडीत काढण्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. लालू प्रसाद यादव हे खूप दिवसांनी बैठकीला हजर आहेत. भाजपविरोधी लढ्यात ते नक्की सक्रिय असतील, असा विश्वासही ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.

ममतांनी घेतली लालूंची भेट

काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल असलेले लालू प्रसाद यादव यांची प्रकृती एकदम ठिक असून ते भाजपविरोधात लढू शकतात, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सांगितले. विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीसाठी ममता बॅनर्जी ह्या गुरुवारीच पाटणा येथे दाखल झाल्या होत्या. त्यांनी लालू प्रसाद यांची भेट घेतली. या भेटीत ममता बॅनर्जी ह्या लालू प्रसाद यादव यांच्या पाया पडल्या. राबडी देवी यांना त्यांनी साडी भेट दिली. माझे आणि लालू प्रसाद यांचे कौंटुबीक संबंध आहेत. मी त्यांचा आदर करते. ते एक वरीष्ठ नेते आहेत. ते तुरुगांत होते व नंतर उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या कुटुंबालाही याचा नाहक त्रास झाला. पण आता लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. ते भाजपविरोधात लढा देऊ शकतात,असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.

 

First Published on: June 23, 2023 5:20 PM
Exit mobile version