धक्कादायक! चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाने लावली सहप्रवाशाला आग; तिघांचा मृत्यू, 9 जण जखमी

धक्कादायक! चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाने लावली सहप्रवाशाला आग; तिघांचा मृत्यू, 9 जण जखमी

चालत्या ट्रेनमध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशाला आग लावल्याची धक्कादायक घटना केरळमधील कोझिकोडमध्ये घडली. रविवारी ही घटना घडली. या घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, 9 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढण्यावरून झालेल्या वादात एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पेटवून दिले. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. (man sets fire to co passenger after argument in moving train three died nine injured)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ९.४५ च्या सुमारास अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेस ट्रेन कोझिकोड शहर ओलांडल्यानंतर कोरापुझा रेल्वे पुलावर आली असता एका अज्ञात व्यक्तीने सहप्रवाशावर प्राणघातक हल्ला केला आणि त्यावर ज्वलनशील द्रव टाकून आग लावली, ज्यामध्ये अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढली त्यामुळे ट्रेनचा वेग कमी झाला आणि याचाच फायदा घेत आरोपीने तेथून पळ काढल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे संरक्षण दलाला (आरपीएफ) दिली. त्यानंतर आरपीएफने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यात आली. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही प्रवाशांनी या घटनेनंतर एक महिला आणि एक मूल हरवल्याची तक्रारही केली. त्यानंतर शहर पोलिसांनी रुळांची पाहणी करून महिला आणि लहान मुले आणि एका मध्यमवयीन पुरुषासह तीन मृतदेह बाहेर काढले. मुलाचे वय एक वर्ष होते. आग लागल्याचे पाहून एकतर ते रेल्वेतून पडले किंवा त्यांनी खाली उतरण्याचा प्रयत्न केला, असा पोलिसांना संशय आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर “बेपत्ता महिला आणि बालक रुळांवर मृतावस्थेत आढळले. एका पुरुषाचा अज्ञात मृतदेह सापडला आहे. आम्हाला संशयिताचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. चौकशी सुरू आहे”, अशी माहिती एका वरिष्ठ जिल्हा पोलीस अधिकाऱ्याने दिली.

प्राथमिक माहितीनुसार, दोन व्यक्तींमध्ये झालेल्या भांडणानंतर ही घटना घडल्याचा संशय आहे. कोझिकोड पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एकूण नऊ जणांना कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयासह विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींची पदवी ऐतिहासिक…, नव्या संसदेच्या गेटवर लावा; संजय राऊतांची टीका

First Published on: April 3, 2023 8:39 AM
Exit mobile version