#MeToo वादळ मोदी सरकारमधील मंत्र्याचा बळी घेणार?

#MeToo वादळ मोदी सरकारमधील मंत्र्याचा बळी घेणार?

केंद्रीय राज्यमंत्री ए.जे. अकबर

बॉलिवूडमध्ये #MeToo अभियानाने खळबळ माजवली असताना या वादळाच्या तडाख्यात आता मीडिया आणि मोदी सरकारमधील मंत्रीसुद्धा अडकण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ होत चालली आहे. प्रिया रमाणी यांनी आरोप केल्यानंतर आणखी काही महिलांनी पुढे येऊन अकबर यांच्यावर आरोप केले आहेत. काँग्रेसचे जेष्ठ नेते जयपाल रेड्डी यांनी अकबर यांच्यावर झालेल्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी लावून धरली असून त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहीजे, असे रेड्डी यांनी सांगितले आहे. #MeToo मोहीमेच्या तडाख्यात मोदी सरकारदेखील आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. रुपयाची घसरण, वाढती महागाई, राफेल डिल अशा अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करणारे मोदी सरकार अकबर यांचा राजीनामा घेणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हे माहितीये का – #MeToo चळवळ: काय आहे इतिहास, कशी झाली सुरुवात

दुसरीकडे सुषमा स्वराज यांनी अकबर यांच्या प्रकरणाबाबत मौन बाळगल्याबद्दल काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी स्वराज यांच्यावर टीका केली आहे. ‘सुषमा स्वराज यांनी त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यावर झालेल्या आरोपांवर मौन का बाळगले आहे? तसेच #MeToo अभियानाबाबत अश्लाघ्य आरोप करणाऱ्या भाजपचे खासदार उदित राज यांच्याबाबतही भाजप शांत का? असे प्रश्न प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केले आहेत.

चार ते पाच महिला पत्रकारांचा आरोप

प्रिया रमानी या महिला पत्रकाराने ट्विट करत केंद्रीय मंत्री आणि टेलिग्राफचे माजी संपादक एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यासोबतच आणखी चार ते पाच पत्रकार महिलांनी याप्रकारचा आरोप अकबर यांच्यावर केला आहे. वरिष्ठ पत्रकार गजला वहाब यांनी ‘द वायर’ या वेबसाईटवर लेख लिहून ‘द एशियन एज’ या दैनिकात काम करत असताना आपला लैंगिक छळ केला असल्याचे सांगितले आहे.

गजला वहाब आपल्या लेखात सांगतात की, “१९८९ साली माझ्या बाबांनी मला अकबर यांचे ‘Riot after Riot’ हे पुस्तक आणून दिले होते. त्यानतंर मी त्यांची अनेक पुस्तके वाचत गेले. मला एक नवीन लेखक मिळाला होता. त्यांचे लिखाण आवडल्यामुळे मी पत्रकारितेत येण्याचा निर्णय घेतला. १९९४ साली मी एशियन एजमध्ये इंटर्न म्हणून कामाला लागले. त्यानंतर १९९७ सालातले ते सहा महिने कधीच विसरु शकत नाही. त्या सहा महिन्यात अकबर त्यांच्या केबिनमध्ये माझ्यासोबत अश्लिल वर्तन करायचे.”

धक्कादायक – महिलेचे महिलेविरोधातच #MeToo

First Published on: October 10, 2018 10:14 PM
Exit mobile version