मुलीला हार्वर्डची पदवी आणि वडिलांना केंद्रात मंत्रीपद एकाच दिवशी

मुलीला हार्वर्डची पदवी आणि वडिलांना केंद्रात मंत्रीपद एकाच दिवशी

दिनांक ३० मे. एका बाजूला वडील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळात दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेत असताना त्याच दिवशी मुलगी प्रतिष्ठित हॉर्वर्ड विदयापीठाची पदवी स्वीकारत असते. ही एखाद्या कुटुंबासाठी खूपच आनंददायी घटना. एकाच वेळी आई म्हणून आणि पत्नी म्हणून हा आनंद तर फारच मोठा ठरतो. हा आनंद वाटयाला आलेली महिला आहे नरेंद्र मोदी सरकारमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री असलेल्या पीयूष गोयल यांची पत्नी.

आपल्या कुटुंबाच्या वाटेला एकाचवेळी आलेल्या या आनंदाबद्दल गोयल यांच्या पत्नीने लिहिले आहे. त्या म्हणतात, ‘ ३० मे २०१९, हा दिवस माझ्या कुटुंबासाठी काय मोठा दिवस आहे. मुलगी आणि वडील एकाच दिवशी आपल्या क्षेत्रात गॅज्युएट झाले. बोस्टन येथून हार्वर्ड विद्यापीठातून मुलीने पदवी घेतली, तर दिल्लीमध्ये पतीने दुसऱ्या वेळेस केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत….’

विशेष म्हणजे आपल्या मुलीचे हे कौतुक आणि पत्नीच्या भावना दस्तूरखुद्द केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी फेसबुकवर शेअर केल्या आहेत. ते मुलीसाठी लिहितात की पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन, राधिका. आयुष्यातील नव्या पर्वाला तू यशस्वीपणे सुरूवात केली आहेस. मला माझ्या या प्रवासात माझ्या कुटुंबियांची साथ मिळाली या बद्दल मी भाग्यवान समजतो. सध्या ही पीयूष गोयल यांची ही वैयक्तिक पोस्ट व्हायरल होत असून अनेकांनी त्यांना व त्यांच्या मुलीला शुभेच्छा देत त्यांच्या कुटुंबाचे कौतुक केले आहे.

First Published on: May 31, 2019 1:34 PM
Exit mobile version